महाड आणि पोलादपूर तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील महिला व पुरूषांसाठी वैयक्तीक तसेच सामाजिक विकासासह आदिवासीवाडयांच्याही विकासासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी व्यक्त केले.
श्रमजिवी जनता सहायक मंडळ आणि सावित्री आदिवासी सहकारी पतसंस्थेतर्फे आदिवासी आदिशक्ती वार्षिक संमेलन मेळाव्याचे आयोजन येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये करण्यात आले असता प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार पालकर बोलत होते. यावेळी आदिवासी आधार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वाघे, सावित्री आदिवासी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सुनिता हिलम, व्यवस्थापक विठ्ठल कोळेकर, व्हाईस चेअरमन कुंदा जगताप, सुरेश हिलम, काशी वाघमारे, वत्सला जगताप, जयराम जाधव, संदीप वाले, सुरेखा जाधव, जना जाधव आदी संचालक तसेच मेघा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार पालकर यांनी, राज्याच्या आणि केंद्राच्या आदिवासी विकास योजनांची संख्या पाहता देशातील आदिवासी मागासलेला राहण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ आदिवासींसाठी निर्लोभी भावनेने काम करणाऱ्यांची संख्या कमी असल्यानेच सध्या आदिवासी बांधव भगिनींना विकासापासून वंचित असल्याचे पाहावे लागत आहे. पोलादपूर तालुक्यातील आदिवासी शिक्षण, आरोग्य, रस्ते, निवारा आणि रोजगारापासून वंचित असताना गेली 10-15 वर्षे श्रमजिवी जनता सहायक मंडळाने केलेल्या कामामुळे आदिवासी संघटितपणे एकत्र येऊ लागला आहे.
आदिवासी विभागामार्फत अनेक वैयक्तीक लाभाच्या, वाडीवस्त्यांच्या विकासाच्या तसेच समाजाच्या हिताच्या योजना आखण्यात आल्या आहेत. आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शहरातील नामांकित निवासी शाळांमध्ये आदिवासी पाल्यांना शिक्षण, पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना, आहार, वाहनचालक प्रशिक्षण, आदिवासी सेवक व संस्था पुरस्कार तसेच ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा अशा विविध योजनांची माहिती सांगून पत्रकार पालकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभांना उपस्थित राहून विविध योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी आदिवासी सुशिक्षित तरूणांना तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी व्यवस्थापक विठ्ठल कोळेकर यांनी सावित्री आदिवासी सहकारी पतसंस्थेच्या 2023-24 सालाची जमाखर्चाची तेरीज, ताळेबंद व नफा तोटा पत्रकांचे वाचन करून महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये पतसंस्थेचे 2023 सभासद झाले असल्याची माहिती देताना संस्थेचे भागभांडवल 8 लाख 6 हजार 400 रूपये तर कर्ज येणे बाकी रक्कम 28 लाख 33 हजार 365 रूपये तर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुरक्षितता व सरळतेपोटी 23 लाख रूपये गुंतवणूक असल्याची माहिती देऊन आदिवासींच्या व्यवसायांसाठी कमी व्याजदरामध्ये कर्जपुरवठा करण्याची भुमिका यावेळी स्पष्ट केली.
आदिवासी आधार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वाघे यांनी उपस्थितांचे आभार मानताना बाळासाहेब कोळेकर आमचे प्रेरणा व स्फूर्तीस्थान असल्याचे स्पष्ट करून आदिवासींना एकजुटीने उभे राहण्यास श्रमजिवी जनता सहायक मंडळानेच प्रवृत्त केल्याचे सांगितले.
यानंतर आदिवासी समाजातील महिला व तरूणींनी पारंपरिक नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सुमारे एक हजाराहून अधिक आदिवासी महिला व पुरूष या आदिशक्ती आदिवासी मेळाव्यास उपस्थित राहिले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.