तालुक्यातील गडकिल्ल्यांची उपेक्षा दिवसेंदिवस जीर्णावस्थेकडे नेत असल्याने सडे गावातील कांगोरीगड विकास मंडळ, यांच्यावतीने कांगोरीगडाच्या विकासासाठी अंगमेहनत आणि खर्चाची मानसिकता ठेऊन जोरदार प्रयत्न सुरू असून असीम इच्छाशक्तीच्या जोरावर आज दि. 19 फेब्रुवारीला कांगोरीगड तथा मंगळगडावर पहिल्यांदाच छ.शिवाजी महाराजांची जयंतीचा उत्सव सडे गांवच्या तरूणांसह विकास मंडळाच्या पुढाकाराने करण्यात आला. कांगोरीगडाचा दूर्लक्षित आणि उपेक्षित ठेवायचे नाही यासाठी निकाराचा प्रयत्न या छ.शिवजयंती उत्सवाद्वारे करण्यात आल्याचे दिसून आले.
कांगोरीगडावरील कांगुरीनाथाचे मंदिर असून या मंदिराच्या सभागृहाच्या भिंती फुटलेल्या भग्नावस्थेत असताना सडे ग्रामस्थ व तरूणांनी श्रमदान आर्थिक खर्च करून बांधकाम केले. यंदापासून कांगोरीगड म्हणजेच मंगळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यासाठी अवघी तरूणाई एकवटली. संपूर्ण गावानेदेखील मोडा म्हणजे सुट्टी घेऊन शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला.
सकाळी जननीआई गावदेवी मंदिर ते कांगोरीगड यावेळेत शिवप्रतिमेच्या पालखी सोहळयाचा शुभारंभ झाला. हनुमानमंदिरानंतर कुलदैवतांच्या मंदिरातून पालखी संदीप सालेकर आणि विश्वनाथ दाभेकर यांच्या खांद्यावरून कांगोरीगडाकडे रवाना झाली. एका तरूणीने भगवा ध्वज पुढे घेऊन प्रयाण केले तर अन्य तरूण तरूणी व ग्रामस्थ महिला सर्व एकापाठोपाठ एक असे गांडूळकीच्या भुसभुशीत मळवाटेने कांगोरीगड मंगळगडाकडे हिकमतीने चढाई करून लागले. कांगोरीगडाकडे जाणाऱ्या गुराखी सांगू शकतील अशा ढोरवाटा असंख्य आहेत.
मात्र, प्रत्यक्षात या सर्व एकाच ठिकाणी साधारणत: येऊन कांगोरीगडाकडे जाण्याची एकच वाट दिसते. स्थानिक नवरा-नवरीचे सुळके म्हणतात अशा नैसर्गिक ट्वीन टॉवरप्रमाणे सुळक्यांच्या खालून गडावर जाण्याची एकमेव वाट जाते. कांगोरीगड विकास मंडळ मुंबईचे कार्यकर्ते तसेच स्थानिक तरूण तरूणींनी खांद्यावर शिवप्रतिमेची पालखी घेऊन खालूबाजाच्या निनादान वर निरभ्र आकाश आणि खाली खोल दरी अशा अरूंद पायवाटेने प्रवेशद्वारापर्यंत पालखी नेऊन उभ्या पायऱ्या चढून शिवप्रतिमा कांगोरीगडावर पोहाचविली. यावेळी ध्वजारोहण पूजन झाल्यानंतर कांगुरनाथ मंदिरात कांगुरमालासह अन्य देवतांची मूर्तीपूजा तसेच शिवप्रतिमा पूजन व आरती करण्यात आली. यावेळी पूजेसाठी गणेश सालेकर आणि श्रध्दा गणेश सालेकर दाम्पत्याने उपवास धरून पूजेचा मान यथाविधी पार पाडला. कांगोरीगडावर प्रसाद तयार करून पूजेनंतर महाप्रसादाचीही तयारी पूर्ण झाली.
यानंतर कृष्णा सणस, सुनील उतेकर, राजू डिगे, गंगाराम सालेकर, राजूशेठ कदम यांनी कांगोरीगडाच्या ऐतिहासिक पार्श्वभुमीसह भविष्यातील गडाच्या प्रगतीसाठी करायचे प्रयत्न याबाबत माहिती दिली. शिवाजी सालेकर यांनी कांगोरीगड म्हणजेच मंगळगडाचा इतिहास सांगितला. या छोटयाश्या नियोजनबध्द कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांतभाऊ सालेकर यांनी केले.
या कांगुरीनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या माचीवरून नयनरम्य दृश्य दिसते. माचीला जवळ-जवळ अर्धा किलोमीटर आणि 20-30 फुट उंच तटबंदी आहे. यावरून ढवळी व कामथी नद्यांचे खोरे पूर्ण दृष्टीपथात येतात. कांगोरीगडावरील पाण्याची दोन टाकं आहेत. उजव्या हाताला असणाऱ्या वाटेवर बालेकिल्ला आहे. सुरुवातीला अत्यंत निमुळती असलेल्या पायवाटेवरून सावधपणे वाटचाल करावी लागत आहे. साधारणत: 50मीटर अंतरावर गडावरील सर्वात मोठे टाके आहे. त्यातील पाणी जरा बरे स्वच्छ पिण्यायोग्यही आहे. गडावरील या टाक्यात बारमाही पाणी असते. बालेकिल्ल्यावर तीन भग्न वाडे आहेत. सुरुवातीला नुसता जोता असून त्याच्यापुढे दोन शिवलिंग पाषाणात घडवलेली आहेत. त्यापुढील दोन वाडयांच्या भिंती दोन पुरुष उंच असून त्यांना एकच खिडकी असल्याने त्यांचा वापर कैदी डांबण्यासाठी होत असावा असा अंदाज करता येतो. या वाडयांच्या मागे जाणारी वाट तटापर्यंत जाते. तटावरून खाली पाहिल्यास आलेल्या वाटेचा अंदाज येऊ शकतो. हा तट 20-30 फुट उंच बांधला आहे.
सडे आणि मोरसडे परिसरातील ग्रामस्थांना डोळयांसमोर कांगोरीगड म्हणजेच मंगळगड दिसत असून याच गावांमध्ये वास्तव्य केलेले चित्रपट क्षेत्रातील मातब्बर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘छावा’ या सिनेमाने भारतातील अनेक चित्रपटगृहामध्ये एकाच दिवशी प्रसारित होऊन कमाईचा 235 कोटींचा आकडा गाठून उच्चांक गाठला आहे. यामुळे या उपेक्षित कांगोरीगडाच्या विकासाला हातभार लावण्यासह छत्रपती शिवाजी महाराजांनी मंगळगड नामकरण केलेल्या या गडाला शिवप्रेमींच्या नजरेमध्ये स्थान मिळण्यासाठी तरूणाईचे प्रयत्न कठोर परिश्रमपूर्वक असल्याचे दिसून येत होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.