पोलादपूर ( शैलेश पालकर ) : कोकणातील चाकरमानी गणेशभक्तांसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर स्वतंत्र ‘वनवे’ करून कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून कोकणापर्यंत मार्गस्थ करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासूनचा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांचा आटापिटा अनंतचतुर्दशीला गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर संपला असून आज शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 पासून कशेडी घाटाचा पर्यायी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद होत असल्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने दिले आहेत. एकूणच, महामार्गाच्या कामाचे स्वरूप पाहता खारघर येथील सभेत ‘वनवे’ वाहतुकीचे आदेश देत येत्या डिसेंबर 2023 अखेरिस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासंदर्भातील ‘डेडलाईन’ हुकण्याची शक्यता स्पष्ट दिसून येत आहे.
गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांची कोकणाकडे जाण्याची ‘वनवे’ सुविधा खड्डयांसह वापरण्याशिवाय जनतेला पर्याय नसल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 12 ते 14 तास वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र, यावर पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी वनवे भुयारी मार्गातील केवळ 9-10 मिनीटांमध्ये भुयारातून खेडकडे जाण्याचा पर्याय हे मधाचे बोट गणेशभक्तांना पुरेसे ठरले. तीन पदरी भुयारी मार्गापैकी एकपदरी काँक्रीटीकरण अपूर्ण राहिल्याने सहा इंटरकनेक्टीव्हिटीच्या भुयारांतून दुसऱ्या कोकणाकडे जाणाऱ्या समांतर भुयाराशी संलग्नता झालेली नसताना मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराच्या डाव्या बाजूचा काँक्रीटीकरणाचा एक पदर अपूर्ण असूनही याच भुयाराचा कोकणात जाण्यासाठी वापर झाल्यामुळे भुयारातील वाहनांचा वेग 30 कि.मी. प्रतिताशी पेक्षा कमी ठेवावा लागला. यामुळे 2 कि.मी.100 मीटर लांबीच्या या भुयारामध्ये वाहनांची दाटी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक चाकरमानी गणेशभक्तांनी पुणे बंगलोर महामार्गाचा वापर कोकणात जाण्यासाठी केला. यामुळे चिपळूण परिसरातील गणेशभक्त पाटणमार्गे तर त्यापुढील गणेशभक्त साखरपापर्यंत तर त्यापुढील गणेशभक्त फोंडाघाटमार्गे वैभववाडी परिसरामध्ये आपआपल्या खासगी वाहनांनी गेले.
भुयारातील कातळाला काँक्रीटीकरणाची पिचिंग देण्यासाठी स्टीलचे बार उभारण्यात आले असून या बारमध्ये एखादे वाहन अपघातग्रस्त झाल्यास या स्टीलच्या सळया वाहनात आरपार घुसण्याची शक्यता आहे. याशिवाय, या भुयारी मार्गामध्ये छप्परावरील कातळाला केलेल्या काँक्रीटच्या पिचिंगमधून पाण्याचे लोट मोठया प्रमाणात पाझरत वाहनांवर मोठया आवाजासह 20 मीटर्स उंचावरून आदळत असल्याने वाहनांचे छप्पर दणाणले. या पाण्यामुळे भुयारातील दुपदरी रस्ता निसरडा होऊन गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच दोन मोटारसायकली घसरून जखमी झालेल्या मोटारसायकलस्वारांना कळंबणी येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
भुयारामध्ये वायुविजन म्हणजेच व्हेंटीलेशनची सुविधा नसल्याने दुचाकी व तीन चाकी वाहने आणि नॉन एसी वाहनांतील प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटत असल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला. या 2 कि.मी. 100 मीटर्स लांबीच्या भुयारी मार्गातील प्रवासादरम्यान कोणताही भयंकर अपघात झाल्यास, जोपर्यंत वाहने भुयाराबाहेर येणार नाही; तोपर्यंत मोबाईलची रेंज मिळणार नसल्याने अपघातप्रसंगी तातडीची मदत होण्यास विलंब होण्याचा धोका गणेशोत्सवानंतरही आजतागायत कायम आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराचे काम अपूर्ण असूनही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती दाखवून याच भुयारातून कोकणातील चाकरमान्यांना 9-10 मिनिटांमध्ये कोकणात जाण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी कधी मुंबईतून कधी पनवेलमधून तर कधी झारापमधून कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापर्यंत दौरा संपवित हा भुयारी मार्ग चर्चेत आणण्यासाठी सोबत घेतलेल्या ठिकठिकाणच्या पत्रकारांना गोव्यातून विमानाने मुंबईपर्यंत नेऊन मे महिन्यापासून गणेशोत्सवापर्यंत भुयाराच्या लोकार्पणाची फितकापणी करून लक्ष्यवेधी केले. मात्र, आता या भुयाराचा उपयोग किमान गणेशोत्सव संपल्याने थांबवित पुन्हा भुयारांतर्गत कामांना सुरूवात करण्याचा प्रयत्न शुक्रवारपासून केला जाणार आहे.
कोकणाकडे जाणाऱ्या भुयाराची लांबी केवळ 1.8 कि.मी. असल्यामुळे काँक्रीटचे पिचिंग करून त्यावर लालमातीचा भराव टाकून या भुयाराची लांबी सुमारे 200 ते 300 मीटर वाढविण्यात आहे. भुयारी मार्गाकडे जाण्यासाठी करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ता प्रस्तावित असताना दोन्ही भुयारांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील दोन पुल पूर्णत्वास गेले असून अजून 3 पुलांचे काम अपूर्णावस्थेत आहे. या 3 अपूर्ण पुलांपैकी 2 पुलांच्या कामांची नुकतीच सुरूवात झाली असून अपूर्ण कामामुळे रस्ताही अपूर्णच राहिला असल्याने पुल आणि प्रस्तावित सहा पदरी रस्ता तसेच भुयारातील अंतर्गत काम यासाठी पुढील वर्ष अर्धेअधिक सरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. यामुळे खारघर येथील उदघाटनाच्या सभेमध्ये केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी येत्या डिसेंबर 2023 अखेरिस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वास नेण्याची स्वत:ला घालून दिलेली डेडलाईनही टळण्याची खात्रीलायक परिस्थिती दिसून येत आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.