
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
आरसीएफच्या कुरुळ वसाहतीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित शाळा असून शाळेसंदर्भातील शिक्षण विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या व शाळेची नोंदणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे नावे आहे. शासन नियम व शैक्षणिक धोरणानुसार शाळा चालविण्याचे संपूर्ण दायित्व डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे आहे.
शाळेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची नेमणूक आणि शाळा स्थापनेपासून कर्मचार्यांचे दरमहा वेतन डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे द्वारे केले जात असून कर्मचार्यांच्या थकीत वेतनाबाबत आरसीएफचे कोणतेही दायित्व नाही.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सदर शाळेच्या व्यवस्थापनास डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी अनाकलनीय कारणांनी असमर्थता दाखविली असून सदर शाळा सुरू राहावी यासाठी आरसीएफ व्यवस्थापन विविध स्तरावर प्रयत्नशील आहे.
शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने किमान दोन वर्षे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी शाळेचे व्यवस्थापन करावे यासाठी आरसीएफ व्यवस्थापनातर्फे लेखी स्वरुपात वारंवार विनंत्या करण्यात आल्या आहेत.
तसेच सदर शाळा डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी सुरू ठेवण्यासाठी आरसीएफ व्यवस्थापनातर्फे म उच्च न्यायालयात दाद देखील मागण्यात आलेली आहे. शिक्षणाधिकारी (रायगड) यांनी सुनावणी घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्राद्वारे शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याने सदर बाब न्यायप्रविष्ट आहे. शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरावरून शाळेच्या भवितव्याविषयी विचारणा होत असल्याने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे वस्तुस्थिती समोर आणली असल्याचे आरसीएफचे प्रभारी
मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक महेश पाटील यांनी सांगितले आहे.