पेण पोलिसांनी गुरुवारी पहाटे केलेल्या नाकाबंदी दरम्यान अवैध गोवंशीय जनावराची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, २७ मार्च २०२५ – अवैध जनावर वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पेण पोलिसांनी मोठी कारवाई करत एक टेम्पो जप्त केला आहे. गुरुवारी पहाटे ५:०० वाजता मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वडखळ मार्गे पेणच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो क्रमांक MH 06 CP 0859 मध्ये अवैधरीत्या जनावरे नेली जात असल्याचा संशय होता.
पेण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महामार्गावरील वाहतूक चौकीजवळ नाकाबंदी केली. यात पोलीस कर्मचारी विष्णू म्हात्रे, निलेश ठाकूर, धिरज कांबळे आणि प्रकाश पवार यांचा समावेश होता. सकाळी ६:०० वाजताच्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणारा टेम्पो थांबवण्यात आला. तपासणी केली असता, त्यामध्ये खिलार जातीचे दोन मोठे बैल अत्यंत घट्टपणे बांधून ठेवलेले आढळले.
टेम्पो चालक अरविंद बामा अवचटकर (वय ३३, रा. महाजने, ता. अलिबाग, जि. रायगड) याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी कोणताही परवाना नव्हता. तसेच, जनावरे खरेदीची किंवा मालकीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत. परिवहन अधिकाऱ्यांकडेही वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता, कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
सदर जनावरे अवैध कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी पंचासमक्ष टेम्पो आणि जनावरे ताब्यात घेतली आहेत. पुढील तपास सुरू असून, यामागील संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलिसांची चौकशी सुरू आहे.
सदर गुन्हाची खबर सरकार तर्फे निलेश ठाकूर यांनी दिली असून त्याप्रमाणे गु. रजि. नं. ५६/२०२५, प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (डी), (एच), सह पशु वाहतुक अधिनियम १९७८ मधील निमय ४७ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल झाला असुन सदर गुन्हयाचा तपास पेण पोलिस ठाणे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ घोलप करीत आहे.
या प्रकारामुळे अवैध जनावर वाहतुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.