
सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
एसओएस कुटुंब सशक्तिकरण कार्यक्रम सोगाव (अलिबाग) अंतर्गत ६ गावांमध्ये बुधवार दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त “स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता,” हे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
यावेळी एफएसपी अलिबागने स्थापन केलेल्या ६ बाल पंचायतींनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये अलिबाग तालुक्यातील तुडाळ, बांधण, वाघोडे, पोयनाड, भाकरवड आणि पेण तालुक्यातील आमटेम अशा एकूण ६ वेगवेगळ्या गावातील ६ बाल पंचायतीतील मुले, मुली आणि बचत गटाच्या महिला सदस्य या स्वच्छता अभियान कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
यामध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी आपापल्या गावातील शाळा, अंगणवाडी केंद्रांसह मंदिरे, समाजमंदिर व इतर सामुदायिक संस्थांची मोठ्या प्रमाणात स्वच्छता केली. यावेळी गोळा करण्यात आलेला प्लास्टिकसह इतर कचरा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतुन विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना समाजातील त्यांच्या प्राथमिक भूमिका स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी होता. “स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता” या उपक्रमात यावर्षीच्या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे महत्व विषद करून मुले आणि स्वयंसहाय्यता गटाच्या महिला सदस्यांना हिरवेगार आणि स्वच्छ गाव निर्माण करण्यासाठी सामाजिक जबाबदारीची शपथ देण्यात आली. पठाण रियाझ खान, प्रकल्प प्रभारी-एफएसपी आणि एसओएस चिल्ड्रन व्हिलेज, अलिबागच्या मॅनेजमेंट ट्रेनी-एफएस वैष्णवी माटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लस्टरच्या ॲनिमेटर्स आणि शिक्षकांनी या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे ६ गावात उत्तमरीत्या आयोजन व नियोजन केले होते.