उरणमध्ये मासेमारी करणाऱ्या भूमीपुत्रांवर उपासमारीची वेळ !

Machchimar Baithak Uran
उरण (विठ्ठल ममताबादे) :
महाराष्ट्र शासनाने १२ फेब्रुवारी १९७० च्या अधीसुचनेनुसार सण १९८३ साली न्हावा शेवा बंदरच्या उभारणी साठी उरण तालुक्यातील १२ गावच्या हद्दीतील २९३३ हेक्टर जमीन (गावठाण वगळून )संपादित केली. पैकी नुसत्या मौजे नवीन शेवा गावची ७४९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. तसेच शेवा क्षेत्रातील खाजन क्षेत्राचे निवाडे होऊन जमीन जेएनपीटी (जेएनपीए )प्रशासनाने ताब्यात घेतले.
मूळ शेवा गावात एकूण ३६४ घरे व ७१० कुटुंब होती. पुनर्वसनची संपूर्ण जबाबदारी शासनाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवली. त्या काळचे जिल्हाधिकारी संजय नारायण यांनी मात्र प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमीपुत्रांना खोटी आश्वासने देऊन फसविले. सर्वच सेवा सुविधा पासून या प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमीपुत्रांना वंचित ठेवले. परिणामी शेवा गावातील प्रकल्पग्रस्तांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शेवा गावच्या प्रकल्पगस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेवा गावचे नवीन शेवा येथे तात्पुरते पुनर्वसन झाले आहे मात्र परिपूर्ण तसेच योग्य असे पुनर्वसन झालेले नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई नवीन शेवा गावातील मासेमारी करणाऱ्या भूमीपुत्रांना मिळालेला नाही.अशाच प्रकारची समस्या उरण तालुक्यातील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या डोंगरी, पाणजे,फुंडे या गावाच्या बाबतीत झाली आहे.
अनेक आश्वासने या गावच्या ग्रामस्थांना देण्यात आली मात्र या गावांचा विकास अजूनही झालेला नाही. जेएनपीटी (जेएनपीए )प्रशासनाने विविध प्रकल्प डोंगरी ग्रामपंचायत व पाणजे तसेच फुंडे ग्रामपंचायतच्या मासेमारी हद्दीत आणल्याने विविध प्रदूषण होऊन व नैसर्गिक नाले, खाडी, वृक्ष, कांदळवने, वृक्ष नष्ट झाल्याने समुद्रातील मासेमारी नष्ट झाली. शेतीही पिकत नाही आणि मासेमारीही नाही अशा संकटात सापडलेल्या पाणजे व डोंगरी, फुंडे ग्रामस्थांवर, मासेमारी करणाऱ्या भूमीपुत्रांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जेएनपीए प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने त्यांना कोणतेही आर्थिक नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे नवीन शेवा गावातील मासेमारी करणाऱ्या भूमीपुत्राप्रमाणेच डोंगरी गावातील व पाणजे गावातील, फुंडे गावातील मासेमारी करणाऱ्या भूमीपुत्रांनी आपल्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, जेएनपीटी प्रशासन यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला पण नुकसान भरपाई मिळाली नाही. समस्या सुटल्याच नाहीत. त्यामुळे सर्व मासेमारी करणाऱ्या भूमीपुत्रांचे, प्रकल्पग्रस्तांचे समस्या सुटाव्यात व त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी नवीन शेवा गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत यांनी आपली समस्या भारतीय जनता पार्टी प्रणित संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष योगेश म्हात्रे यांच्या कानावर टाकली. लगेचच योगेश म्हात्रे यांनीही ही समस्या भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निर्गुण कवळे यांच्या कानावर टाकली.व त्यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली. तदनंतर नवीन शेवा, डोंगरी, पाणजे, फुंडे येथील सर्व मासेमारी करणारे भूमीपुत्र निर्गुण कवळे यांची भेट घेणार होते.
मात्र निर्गुण कवळे यांनी स्वतः आई शांतेश्वरी मंदिर नवीन शेवा उरण येथे बैठक लावण्याचे सांगून मी स्वतः तिथे येईन व मासेमारी करणाऱ्या भूमीपुत्रांचे समस्या एकूण ते सोडविण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. त्यानुसार दिनांक २२/२/२०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता आई शांतेश्वरी मंदिर, नवीन शेवा, उरण येथे नवीन शेवा, पाणजे, डोंगरी, फुंडे गावातील मासेमारी करणाऱ्या स्थानिक भूमीपुत्रांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत नवीन शेवा, पाणजे, डोंगरी, फुंडे गावच्या ग्रामस्थांनी, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली व्यथा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे राज्य अध्यक्ष निर्गुण कवळे यांच्यसमोर मांडली.या प्रसंगी व्यासपीठावर भा. ज. पा. संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे पदाधिकारी निर्गुणभाई कवळे – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,
श्रीमती. प्रीतीदीदी नायर – सरचिटणीस महिला आघाडी महाराष्ट्र,योगेशजी म्हात्रे – रायगड जिल्हा उपाध्यक्ष,ऍड. आकांक्षा ठाकूर – रायगड जिल्हा संघटक (महिला आघाडी) आदी मान्यवर उपस्थित होते. तर मासेमारी भूमीपुत्रांच्या वतीने भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांतशेठ घरत, उरण तालुका उपाध्यक्ष पंडीतशेठ घरत, महिला उरण तालुका उपाध्यक्ष ललिताताई म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस किसनशेठ सुतार,बिल्डर व डेव्हलपर राकेशशेठ भोईर,पाणजे गावच्या वतीने सरपंच लखपती पाटील, उपसरपंच हितेश भोईर, विजय पाटील ( मळगंगा मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मुख्य प्रवर्तक ), प्रभाकर पाटील,काशिनाथ भोईर ,विलास भोईर , मोतीराम पाटील आणि हेमंत पाटील,कमलाकर भोईर ,जगदीश भोईर, सरपंच संकेत घरत सरपंच डोंगरी,नवीन शेवाचे भारत घरत, वाघेश्वर महिला स्वयम सहायता समूहाचे महिला पदाधिकारी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन व प्रास्तविकेत मासेमारी करणारे स्थानिक भूमिपुत्रांना कसे फसविले गेले याची राजेंद्र घरत यांनी माहिती दिली.शेवा गावाचे ८७ हेक्टर व फुंडे डोंगरी पाणजे गावाच ४९ हेक्टर खजन क्षेत्र जेएनपीटीसाठी संपादित झाल्याचे कब्जा व ताबा पावती ग्रामस्थांकडे आहे. तर शेवा गावाच्या समुद्रात ४०० हेक्टर जमिनीवर मातीच्या भरावाच काम आज ही सुरूच आहे.मात्र येथील स्थानिकांना, मासेमारी करणाऱ्या भूमीपुत्रांना कोणतेही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची खंत राजेंद्र घरत यांनी बोलून दाखवली.
प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांचे समस्या लक्षात घेउन यावेळी निर्गुण कवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना निर्गुण कवळे यांनी सांगितले की आम्ही नवीन शेवा, पाणजे डोंगरी, फुंडे गावातील मासेमारी करणारे भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. केंद्रात व राज्यात आमचीच सत्ता आहे. वेळ पडल्यास दिल्लीतही केंद्रीय मंत्र्यांना भेटून, मिटिंग लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन, उरण विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. अनेक प्रश्नांना त्यांनी न्याय दिला आहे. आताही ते अनेक प्रश्न सोडवित आहेत.त्यांच्या पुढाकाराणे व मत्यस्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर समस्या संदर्भात बैठका घेउन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी, प्रकल्पग्रस्त,स्थानिक भूमीपुत्रांनी, युवकांनी राजकारण न करता आपल्या राजकीय चपला बाहेर ठेवून, पक्ष भेद, जाती भेद मतभेद, भांडणे बाजूला ठेवून नविन शेवा, पाणजे, डोंगरी गावातील विकासासाठी एकत्र या. असे आवाहन निर्गुण कवळे केले.
निर्गुण कवळे यांनी सदर समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यामुळे नवीन शेवा, पाणजे, डोंगरी, फुंडे गावचे उपस्थित सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, भूमीपुत्रांनी निर्गुण कवळे यांचे जाहिर आभार मानले. व ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी करत त्यांना मागणीचे निवेदन दिले. नवीन शेवा गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत, भारत घरत व संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी उत्तम असे आयोजन व नियोजन केल्याने त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले. राजेंद्र घरत यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व उपस्थित मासेमारी करणारे भूमीपुत्र, ग्रामस्थ यांचे आभार मानत कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading