रायगड 32 लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 एप्रिल पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ आहे. सर्व उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा 32 रायगड लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथक प्रमुख राहुल कदम, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. दि. 12, 15,16, 18, 19 एप्रिल या दिवशी 11 ते 3 या वेळेत स्विकारले जाणार आहेत. एका उमेदवारास अधिकाधिक ४ नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा कमी नसावे.
ते पुढे म्हणाले, नामनिर्देशनपत्र हे नमुना २अ मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र सादर करावे. नामनिर्देशनपत्राचा नमुना २अ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १७३ (अ) अन्वये उमेदवाराने स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीपूर्वी शपथ घ्यावी लागेल.
नामनिर्देशनपत्र दाखल करता वेळी येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात बंधनकारक राहील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयीन परिसरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी, असेही श्री.जावळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारत निवडणूक आयोगाच्या ह्या सर्वसाधारण स्वरुपाच्या आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करताना मार्गदर्शक सूचना व तरतूदीनुसार परिपूर्ण नामनिर्देशनपत्र भरण्याची व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची अंतिम जबाबदारी ही उमेदवाराची आहे , असेही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारयादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणे बंधनकारक राहील. उमेदवार स्वतः किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशनपत्र दाखल करावे.
पाच व्यक्तींना प्रवेश
जिल्हाधिकारी म्हणाले, नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात उमेदावारासहीत एकूण ५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. (त्यामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल.) नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराच्या केवळ ३ वाहनांना कार्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. वाहने वाहनतळावरच उभी करण्याची अनुमती राहील. उमेदवार हा ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे त्याच लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रस्तावक असणे बंधनकारक राहील.
त्यांनी सांगितले, सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम २५ हजार रुपये व उमेदवार अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील असल्यास १२ हजार ५०० रुपये भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात, जमात प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करावी.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.