
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
ओबडधोबड रस्त्यातून ई रिक्षाचे मार्गक्रमण करताना चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अखेरीस स्वयंस्फूर्तीने या चालकांनी श्रमदानातून रस्त्याच्या दुरुस्ती साठी पुढाकार घेतला.
दस्तुरी येथील काळोखी भागात असणाऱ्या चढावावर क्ले पेव्हर ब्लॉकचा रस्ता बनविण्यात आला होता. परंतु त्यावरून घोडे घसरून पडतात असे घोडेवाल्यांनी सांगितल्यावर अर्धा रस्ता जांभ्या दगडात घोड्यांना चालण्यासाठी तर अर्धा रस्ता क्ले पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून बनविण्यात आला होता परंतु सद्यस्थितीत याच पेव्हर ब्लॉक वरून घोड्यांची वर्दळ असून आता मात्र घोडे घसरून पडत नाहीत तर नाहक रस्त्याच्या कामाला सुरुवातीला विरोध करावयाचा म्हणून आडकाठी आणली गेली होती. या भागातील रस्त्याची दोनदा दुरुस्ती केल्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची वाताहत झाली आहे.
ओबडधोबड चढावावर ई रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांना तसेच चालकाला त्रासदायक बनले होते. तर बहुतेक रिक्षाचे पाटे तुटल्याने खर्चिक बाब बनली होती. अखेरीस या चालकांनी स्वयंस्फूर्तीने दि. ३० रोजी सकाळी अकरा वाजता श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली असून ज्या ज्या ठिकाणी ब्लॉक निघाल्याने खड्डे पडले आहेत ते सुद्धा भरण्याचे काम केले आहे.
यावेळी रिक्षा संघटनेचे कार्यक्षम अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, शैलेश भोसले, मारुती कदम, दीपक डोईफोडे, किशोर सोनावले, रुपेश गायकवाड,कन्हैया खेर, विजय कदम, अनिता रांजणे, कविता बल्लाळ, सीताराम शिंदे, अक्षय वैद्य ,नजीब, हर्ष शिंदे, विजय केरेकर यांसह अन्य चालक वर्ग मोठया प्रमाणात या श्रमदानाच्या महत्वपुर्ण कामात सहभागी झाला होता.