आ. भरत गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश ! कशेडी घाट अपघातातील 3 मृत विद्यार्थिनींसह रिक्षाचालकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाचा धनादेश सुपूर्त 

bharat-gogavale
पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटातील चोळई येथे रिक्षेवर राखेने भरलेला डम्पर कोसळून 3 विद्यार्थिनींसह रिक्षाचालकाचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. हा अपघात नोव्हेंबर 2022 मध्ये झाल्यानंतर महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून अपघातातील मृतांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी पाच लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, याबाबत पाठपुरावा केल्यानंतर प्राप्त झालेले धनादेश मंगळवारी दुपारी वावे येथील मृत विद्यार्थिनीच्या कुटूंबियांना आ. भरत गोगावले यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
सोमवार,दि. 07 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी खेडकडून भोरकडे राखेने भरलेला आयवा डम्पर घेऊन निघालेल्या कशेडी घाटातील चोळई येथील उतारावर ब्रेक दाबल्यावर पलटी झाला. याचवेळी डम्परजवळून जाणाऱ्या रिक्षेवर राखेचा ढिगारा कोसळून रिक्षाचालकासह तीन डीएडच्या विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर राज्यसरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात आल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी ट्वीटरवरून दिली. यानंतर आ.भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अपघातातील मृतांना सरकारी सानुग्रह अनुदान देण्याची पध्दत नसताना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री ना.शिंदे यांनी चारही मृतांसाठी सानुग्रह अनुदान मंजूर करून धनादेश उपलब्ध केले.
 चोळई येथील अपघातात चालक अमाज उमर बहूर (रा.गोरेगांव, ता.माणगांव, जि.रायगड), रिक्षेच्या मागील भागातून खेड येथे डीएडची परिक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थिनी हानिमा अब्दुल सलाम पोपेरे (रा. नांदवी, ता.माणगांव), अलिया सिद्दीक बहूर (रा.गोरेगांव, ता.माणगांव) आणि नाजनीन मुकीद करबेलकर (रा.वावे, ता.पोलादपूर) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आ.गोगावले यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करून मंगळवारी या धनादेशांचे वाटप मृतांच्या नातेवाईकांना केले.
वावे येथील धनादेश वाटपावेळी आ. भरत गोगावले यांच्याहस्ते नाजनीन मुकीद करबेलकर या मृत विद्यार्थिनीच्या सासऱ्यांना पोलादपूरचे प्रभारी तहसिलदार समीर देसाई, ख.वि.संघाचे संचालक लक्ष्मण मोरे, सरपंच अश्विनी सातपुते, तलाठी वंदना गिमेकर, शौकत तारलेकर, दत्तात्रेय उतेकर, सिध्दार्थ सकपाळ, प्रभाकर महाकाळ, महाडीक, उमेश कालेकर, यासीन करबेळकर आदींच्या उपस्थितीत धनादेश प्रदान करण्यात आला.
यानंतर आ.गोगावले यांनी माणगांव तालुक्यातील गोरेगांव येथे जाऊन प्रमोद घोसाळकर, जगदीश दोसी, मंगेश कदम तसेच गोरेगांव परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नांदवी व गोरेगांव येथील मृत अमाज उमर बहूर, विद्यार्थिनी कुमारी हानिमा अब्दुल सलाम पोपेरे आणि अलिया सिद्दीक बहूर यांच्या नातेवाईकांकडे धनादेश प्रदान केले. याप्रसंगी पोलादपूरचे प्रभारी तहसिलदार समीर देसाई आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading