आ.गोगावले यांचा अभूतपूर्व विजयी चौकार पोलादपूरकरांनी केला जल्लोषात साजरा!

Gogavale Miravanuk In Polad
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
महाड विधानसभा मतदार संघातील पुर्वेतिहास मोडीत काढत आ.भरत गोगावले यांनी सलग चौथ्यावेळी विजय संपादन करीत नवा इतिहास घडविला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतून विधानसभेचा मार्ग सोपा होत असल्याचे यावेळी प्रत्येक बूथनिहाय मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.  पोलादपूरकरांनी शनिवारी मतमोजणीनंतर दुपारपासून रात्रीपर्यंत आ.गोगावले यांचा विजयी चौकार जल्लोषात साजरा केला.
पोलादपूर शहरामध्ये 349, 350, 351, 352, 353, 354 अशी सहा मतदान केंद्रं असून या मतदान केंद्रांमध्ये आ.गोगावले यांना अनुक्रमे 391, 296, 379, 293, 258, 335 अशी एकूण 1912 मते मिळाली. याच मतदान केंद्रांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांना 531, 320, 279, 213, 242, 299 अशी एकूण 1874 मते मिळाली. या शहरी भागातील मतदानाने केवळ 34 मतांचे मताधिक्य आ.गोगावले यांना दिले असले तरी पोलादपूर नगरपंचायत क्षेत्राला कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीमधील रानबाजिरे व सडवली ग्रामपंचायतीमधील चोळई ही महसूली गावे जोडल्याने पोलादपूर शहराची मतदार संख्या वाढलेली दिसून आली. या मतदार संख्येमधून महायुतीचे उमेदवार आ.गोगावले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांना झालेल्या मतदानातील अटीतटीचा फरक शहराची बदलती मानसिकता तसेच नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांची मानसिकता स्पष्ट करीत आहे.
महाड विधानसभा मतदार संघातील पोलादपूर तालुक्यातील 327 माटवण हे पहिले मतदान केंद्र असून गोगावले यांना 493 व जगताप यांना 357 मतदान झाले. 393 पळचिल हे पोलादपूर तालुक्यातील शेवटचे मतदान केंद्र असून याठिकाणी गोगावले यांना 274 व जगताप यांना 133 मतदान झाले. पोलादपूर तालुक्यातील शहरी 6 आणि ग्रामीण 61 अशा एकूण 67 मतदान केंद्रामधून आ.गोगावले यांना 18 हजार 230 तर स्नेहल जगताप यांना 12 हजार 380 मतदान झाले. यामध्ये आ.गोगावले यांना पोलादपूर तालुक्यातील एकूण मताधिक्य 5 हजार 850 असल्याचे दिसून आले.
पोलादपूर तालुक्यातील 61 ग्रामीण मतदान केंद्रं ही ग्रामपंचायतींच्या मतदारांसोबत निगडीत असून शिवसेना शिंदे गटाने पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आणल्यामुळे हेच प्रभावी कार्यकर्ते अन्य मतदारांनाही आकर्षित करू शकले असल्याचे दिसून आले. याउलट, स्नेहल जगताप यांनी ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसतर्फे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविल्या आणि त्यानंतरच्या दोन्ही टप्प्यांतील ग्रामपंचायती निवडणुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लढविल्या. मात्र, दोन्ही टप्प्यांमध्ये त्यांच्या समर्थकांना घवघवीत यश मिळण्याबाबत स्थानिक नेतृत्व पूर्णपणे उदासिन दिसून आले.
याखेरिज, लोकसभा निवडणुकांनंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते एकत्रितपणे महायुतीतील घटकपक्षामध्ये प्रवेश करू पाहात असताना त्यांचे डॅमेज कंट्रोल त्यांना ज्या पक्षात जाण्याची इच्छा त्याच पक्षाच्या नेत्याने योग्य वेळ न दिल्याने झाले म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यातील कमालीची उदासिनता दिसून आली. तसेच आ.गोगावले यांच्यासोबतच्या शिवसैनिकांसोबत पिढयान् पिढया राहिलेल्या कुटूंबांतील महिला व तरूण कार्यकर्त्यांना महत्वाची पदे मिळाल्याने केवळ मिरवण्याशिवाय या पदाधिकाऱ्यांकडून कोणताही पक्षप्रचार झाला नसल्याने संघटनात्मक बदलांचीही गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading