आयुष्यातील एकही निवडणूक हरलो नाही गेल्या तीन वेळा आमदार झालो; जनतेच्या आशीर्वादाने चौथ्यांदाही आमदार होऊन मंत्री होणार : आ.गोगावले

Gogavale Prachar Sabha
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरताना आयुष्यातील एकही निवडणूक हरलो नाही. त्यामुळे गेल्या तीन वेळा आमदार झालो तसेच चौथ्यांदाही जनतेच्या आशीर्वादाने आमदार होऊन मंत्री होईन, असा दृढविश्वास 194 महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला.
महायुतीचे विधानसभा उमेदवार आ.भरत गोगावले पोलादपूर शहर आणि लोहारे जि. प. मतदार संघातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन पोलादपूर शहरातील शिवाजीनगर येथील मैदानात काढण्यात आले असता आ. गोगावले बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विठोबा पार्टे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, एकनाथ कासुर्डे, वारकरी संप्रदायाचे तरुण प्रचारक ह. भ. प. भगवान महाराज कोकरे, भाजपच्या रचना धुमाळ, तालुका संपर्कप्रमुख किशोर जाधव, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, भाजपच्या अर्थ व नियोजन सभापती अंकिता निकम, महिला बालकल्याण सभापती अस्मिता पवार, कॅप्टन मोरे, शहर प्रमुख सुरेश पवार, रिपब्लिकन पार्टीचे सुदास मोरे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, पोलादपूर पं.स. चे माजी सभापती महादेव निविलकर तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.
पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये राज्यात महायुतीच्या सत्तेसह आमदार गोगावले यांच्या विजयासाठी शहर प्रमुख सुरेश पवार यांनी नवस केला. यावेळी आ. गोगावले आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काळभैरवनाथांना साकडे घालण्यात आले. यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढपुतळयाला अभिवादन करून आ. भरतशेठ गोगावले यांची प्रचार मिरवणूक पोलादपूरच्या बाजारपेठेतून शिवाजीनगर येथील सभास्थानी निघाली.
पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती प्रसाद इंगवले यांनी आ. गोगावले यांचे रेड कार्पेट घालून जेसीबीतून महापुष्पहार पण करून पुष्पवर्षाव करून स्वागत केले.
आमदार गोगावले पुढे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात सरकारी योजनेची विकास कामे करताना 194 महाड विधानसभा मतदारसंघात एकही गाव आणि वाडी शिल्लक राहिली नाही जिथे आम्ही विकास कामे केली नाहीत. महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांची वाडयांची नावे आम्ही तोंडपाठ सांगू शकतो कारण आम्ही तिथे कामे केलेली आहेत. सर्वांच्या विशेषत: गोरगरीबांच्या हाकेला धावून जाणारा म्हणून भरतशेठला ओळखले जाते. ही सेवा करण्याची संधी चौथ्या वेळी देखील जनता आम्हाला देईल त्याचा ठाम विश्वास आहे, असे सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकात महाड कृउबा संचालक लक्ष्मण मोरे यांनी आपले उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले हे केवळ महाड, पोलादपूर, माणगाव, रायगड जिल्हा, महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशात तसेच जगभरातील 124 देशांमध्ये इंटरनेट द्वारे महाराष्ट्रातील बंडाची दखल घेण्यात आली त्यामुळे जगभर पोहोचलेले नेते आहेत. कलियुगातील ते देवच आहेत, अशा भावना व्यक्त केल्या.
यानंतर वारकरी संप्रदायाचे नेते ह.भ.प. भगवानमहाराज कोकरे यांनी आ. भरतशेठ गोगावले यांचे भगव्याचा स्वाभिमान आणि धनुष्यबाणाची आण पायदळी तुडवली जात असताना त्या विरोधात बंड करण्याची भूमिका घेतली याबद्दल अभिनंदन केले. देशात मोदी सरकार मोदी आले तसेच राज्यात भाजप शिवसेना महायुती सरकार येण्याची गरज आहे. आ.गोगावले यांना पुन्हा निवडून देण्यासाठी सर्व उपस्थित बंधू भगिनींनी शपथ घेण्याची गरज आहे असे सांगून ह.भ.प. कोकरे महाराज यांनी सर्वांना हात उंचावून मुठी वळून शपथ घेण्यास प्रवृत्त केले. याप्रसंगी कर्नल किशोर मोरे यांनी देव आणि जवानांसाठी झटणारे आमदार पुन्हा निवडून यावेत असे आवाहन केले.
याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी गुरुवारी संध्याकाळी झालेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीर सभेचे वाभाडे काढताना आ. गोगावले यांनी केलेला विकास बघण्याची दृष्टी तुमच्यामध्ये राहिली नसेल तर आ. गोगावले यांचा कार्यअहवाल वाचायला देऊ असे सांगून पोलादपूर तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी चंद्रकांत कळंबे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सभेमध्ये कमी उंची असलेल्या वक्तयाची खिल्ली उडवली तसेच नरवीरांचे बोगस वंशज काल आमदारांविरूध्द बोलत असल्याची चेष्टादेखील केली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर तसेच अन्य मान्यवरांची भाषणे झाली. पोलादपूर नंदीवाले समाजाचा यावेळी आ. भरतशेठ गोगावले यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. शेवटी तुर्भे बुद्रुक येथील शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश घेण्यात आला. देवपूर, पैठण, गोळेगणी, तुर्भे येथील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रं देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading