तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विद्युतग्राहक जनतेला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नी ‘आपली माती आपली माणसं’ सामाजिक संघटनेमार्फत महावितरणसोबत तीव्र संघर्षाची भुमिका घेण्यात आली असूनही पोलादपूरकर जनतेकडून या भुमिकेसंदर्भात उदासिनता दर्शविण्यात आल्याने पोलादपूरकर स्वत:च्या समस्यांऐवजी केवळ रेडयांच्या झोंब्यांसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात या पूर्वानुभवावरून सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज पार्टे आणि अध्यक्ष निलेश कोळसकर यांनी महावितरणकडून विविध प्रश्नी महिनाभरात समस्या निवारण न झाल्यास रेडयांच्या झोंब्यांचा जालिम उपाय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पोलादपूर तालुक्यातील माजी सभापती संभाजीदादा साळुंखे, लोहारेचे माजी सरपंच किसन पारकर, संजय उतेकर, अर्जून पार्टे, भगवान पार्टे, गणपत उतेकर, दर्पण दरेकर, ओंकार मोहिरे यांच्यासह असंख्य पोलादपूरकरांनी’आपली माती आपली माणसं’ सामाजिक संघटनेच्या आवाहनानुसार पोलादपूर येथील महावितरण कार्यालयामध्ये उपस्थित राहून विविध समस्यांचा आढावा महावितरणचे अभियंते चोरमाळे, पाटील, महाडीक, चव्हाण आणि कदम यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
यामध्ये खराब विद्युतमीटर तातडीने बदलणे, बंद घरांची विजबिले किमान असावीत, बिले वेळेवर न मिळाल्यास दंडात्मक कारवाईचा भुर्दंड बंद व्हावा, अवाढव्य बिलांबाबत आधी भरा मगच दाद मागा ही भुमिका बंद व्हावी, नवीन विद्युतमीटरसाठी 8 हजार रूपयांची मागणी केली जाते, सिमेंटचे पोल आणि लोखंडी पोल आवश्यक तिथे बदलण्याची गरज आहे. गंजलेले विजेचे पोल तातडीने बदलावे, कर्मचारी व अधिकाऱ्यांची वागणूक व्यवस्थित असावी, या आणि अन्य मागण्यांसाठी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना ‘आपली माती आपली माणसं’ सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. पितळवाडीतील कनिष्ठ अभियंता पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘आपली माती आपली माणसं’ सामाजिक संघटनेने महावितरण कार्यालयामध्ये चर्चेसाठी बोलविण्यात आल्यानंतर सोशल मिडीया आणि मोबाईलवरून संपर्क साधून अनेक समाजधुरिण तसेच राजकीय व्यक्तींना पोलादपूरकर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मात्र, संघटनेच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त कोणीही स्वारस्य न दाखविल्याने तालुक्यातील जनता रेडयांच्या झोंबीला रात्रीपासूनच उपस्थित राहात असल्याने महावितरणने प्रश्न न सोडविल्यास रेडयांच्या झोंबीचे आयोजन करून जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन करू, असा पवित्रा संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी पोलादपूरकर जनतेच्या उदासिनतेवर जोरदार प्रहार केला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.