आदिवासी शेतीला सौरऊर्जेची नवी चालना – रायगड जिल्ह्यात 400 एकरवर पोर्टेबल सोलार पंप योजना यशस्वी

Kishan Jawale Solar Project
रायगड : 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागातील शेतीला बळकटी देण्यासाठी रायगड जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत 400 एकर क्षेत्रावर शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना पोर्टेबल सोलार पंपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून, याचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात करण्यात आला.
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जावळे यांनी व्यक्त केला. सुमारे 40 दिवसांपूर्वी त्यांनी रोहा तालुक्यातील किल्ला गावाला दिलेल्या भेटीत, 400 एकर क्षेत्रात निर्यातक्षम भाजीपाला पीक घेतले जात असल्याचे लक्षात आले होते. मात्र ही शेती डिझेल पंपांवर आधारित असल्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक 1.30 कोटी रुपयांपर्यंत खर्च सहन करावा लागत होता.
पारंपरिक सोलार पंप बसवण्यात तांत्रिक अडचणी आल्याने ‘पोर्टेबल आणि मुव्हेबल सोलार पंप सेट’ तयार करण्याची संकल्पना पुढे आली. सौरऊर्जा क्षेत्रातील अभिजित धर्माधिकारी यांच्या मदतीने हा खास डिझाईन करण्यात आलेला सोलार पंप ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहज एका शेतातून दुसऱ्या शेतात नेला जाऊ शकतो.
सध्या या पंपांची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, पाच एचपी क्षमतेने पाणी पंपिंग करण्यात यश मिळाले आहे. लवकरच आणखी अशा सोलार पंप शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. यामुळे डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.
या उपक्रमामुळे केवळ आर्थिक लाभच नव्हे तर पर्यावरणपूरक शेतीसही चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरणारा प्रकल्प ठरणार आहे.
या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवल, तहसीलदार किशोर देशमुख, कृषी अधिकारी महादेव करे, तसेच मकरंद बरटक्के व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading