
मुंबई :
महाराष्ट्रातील महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अशाच महत्त्वाच्या योजना आहेत. विशेष म्हणजे यातील लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभही मिळू लागला आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळाले आहेत.
याआधीही राज्य आणि केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये केंद्रातील सरकारने सुरू केलेल्या लखपती दीदी योजनेचा देखील समावेश होतो. दरम्यान आज आपण याच लखपती दीदी योजनेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
अशी आहे लखपती दिली योजना?
लखपती दीदी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. महिला सक्षमीकरणासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक महिला आत्मनिर्भर व्हावी, स्वावलंबी बनावी, महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे हे या योजनेचे प्रमुख आणि महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
या योजनेतून महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. स्किल ट्रेनिंग सोबतच या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून दिले जात आहे. म्हणजेच कौशल्य प्रशिक्षण देऊन महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून या योजनेतून मदत पुरवली जात आहे.
ही मदत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. या योजनेतून दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याज आकारले जात नाही हे विशेष. या योजनेतून महिलांना एक लाखांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते.
या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी महिलांना प्रशिक्षण दिले जाते. व्यवसाय सुरू करण्यापासून ते अगदी व्यवसायाची मार्केटिंग करण्यापर्यंत महिलांना मदत दिली जाते. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या लखपती दीदी योजनेअंतर्गत एक कोटी महिलांना लाभ देण्यात आला आहे.
महिलांना लखपती बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतुन अजूनही कोट्यावधी महिलांना लाभ दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठावरून या योजनेबाबत सर्वसामान्यांना अवगत केले आहे.
असा करा अर्ज
या योजनेचा लाभ हा फक्त भारतीय महिलांना मिळतो. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटासोबत जोडलेल्या असणे आवश्यक आहे. म्हणजेच बचत गटातील महिलांनाचं याचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ 18 ते 50 वयोगटातील महिलांना मिळतो.
या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर पात्र महिलांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, बिजनेस प्लॅन या आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज प्रादेशिक स्वयंसहायता कार्यालयात सादर करायचा आहे. अर्ज सादर झाल्यानंतर या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे.