चौकार मारणार चौकार मारणार असे या निवडणुकीत सातत्याने सांगितले जातेय. मी स्नेहल जगताप यावेळी षटकार मारणार आणि तोही व्याजासह मारणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांनी पोलादपूर येथील सभेप्रसंगी बोलताना प्रतिस्पर्धी उमेदवार आ. गोगावले यांना दिला.
यावेळी डॉ. बानगुडे पाटील यांनी महायुतीच्या योजनांच्या लाडक्या बहिणीच्या पंधराशे रूपयांपेक्षा प्रसिध्दी व जाहिरातीवर जास्त खर्च करण्यात आल्याने राज्यावर 900 कोटीचे कर्ज करून ठेवले असून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. असे असेल तर हे सरकार काय कामाचे, असा सवाल करून यांना हद्दपार केलेच पाहिजे, असे आवाहन मतदारांना केले.
महाविकास आघाडी तर्फे स्नेहल माणिक जगताप यांच्या प्रचारार्थ पोलादपूर येथे डॉ.नितीन बानगुडे पाटील यांच्या सभेचे आयोजन 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले. या सभेला मोठया प्रमाणावर नागरिकांनी गर्दी करत परिवर्तन अटळ असल्याचे दाखवून दिले.
याप्रसंगी रायगड दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, जिल्हा प्रवत्तेफ् धनंजय देशमुख, सहसंपर्कप्रमुख बाळकृष्ण राऊळ, माजी सभापती दिलीप भागवत, माजी जिप सदस्य अनिल नलावडे व मुरलीधर दरेकर तसेच अपर्णा जाधव,माजी नगराध्यक्ष निलेश सुतार, महमद मुजावर, काँग्रेस अध्यक्ष बाळाराम मोरे, शेकापक्ष चिटणीस वैभव चांदे, डॉ.स्विटी गिरासे, अमोल भुवड, अमरदीप नगरकर, स्वप्निल भुवड, पोलादपूर तालुका प्रमुख अनिल मालुसरे व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी स्नेहल जगताप यांनी, स्नेहल जगतापला कमी लेखू नका. या स्नेहलमुळेच गोगावले कुटूंबाला रस्त्यावर उतरून प्रचार करावा लागतोय यातच माझा विजय आहे. येणाऱ्या 23 नोव्हेंबरला गुलाल माझाच असणार. असा खणखणीत इशारा देत तुम्ही विकास केला सांगताय मात्र, आजही तुम्ही गावागावात विकास करण्यासाठी एक संधी द्या असे का सांगता, तुमचा विकास फलकावर आणि तुमच्या घरात झाला आहे.
औद्योगिक वसाहतीमधील थर्ड पार्टीमधील तरुणांच्या पगाराच्या कमिशनवर तुमचा धंदा चालतोय. तो मोडीत काढणार. या मतदार संघात 15 वर्षे नवीन कारखाने आले ना दर्जेदार शिक्षण संस्था आली तसेच आरोग्याचा प्रश्नही सुटला नाही मग तुम्ही काय विकास केलात, असा सवाल करताना अंतर्गत गटारे, रस्ते ही कामे तर ग्रामपंचायतीचा सदस्यही करतो अशी टीका करत आमदार म्हणजे जनता व राज्यशासन याच्या मधील दुवा आहे.
मात्र, या मतदार संघात भलतेच घडले आहे दुवा सोडा, गुंडगिरी दडपशाही करीत आहेत. तुमच्या डोक्यावर त्यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा हात होता म्हणून तुम्ही निवडून येत होतात. आता तोच हात स्नेहल जगतापच्या डोक्यावर आहे तुम्ही कसे निवडून येणार? येथील जनता तुमचा पराभव करणार. ही निवडणूक जनतेने व महिलांनी हाती घेतल्याचे सांगताना आ.गोगावले यांच्या कार्यपध्दतीचे वाभाडे स्नेहल जगताप यांनी त्यांच्या आक्रमक भाषणात काढले.
डॉ. नितीन बानगुडे पाटील यांनी राज्यसरकारचा जोरदार समाचार घेताना मतदारसंघातील अनेक राजिप शाळा बंद पडत आहेत ते का तर चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्याने. एसटीबसेस धड नाहीत आणि येथील अध्यक्ष शिवनेरी बसमध्ये शिवकन्या आणणार आहेत अशी योजना जाहीर करताहेत. हे जाहिरात बाजी करत आहेत. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही असे सांगताना ते जेव्हा मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन वर्षा बंगला सोडला तेव्हा संपूर्ण शिवभक्त त्या ठिकाणी जमा झाला होता. मात्र, हे 40 गद्दार खोकेबहाद्दर टेबलावर नाचून महाराष्ट्र पायधुळीस मिळवत होते, असे म्हणत मतदारांना भावनिक साद घालत उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी स्नेहल जगताप यांना मशाल चिन्हासमोरील बटन दाबून निवडून द्या. असे आवाहन केले.
युतीसरकारच्या काळात साडेतीन वर्षच्या मुलीवर बलात्कार होतो त्यावेळी तसेच मराठयांवर आणि वारकऱ्यांवर लाठीहल्ला होतो असे सांगून अनेक जिल्ह्यात अशा घटना घडतात आणि हे सरकार गप्प बसते याला जबाबदार मुख्यमंत्री व त्याचे 39 गद्दार साथीदार आहेत यांना या मातीत घाडण्यासाठी पुन्हा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेत आणायचे आहे. यावेळी डॉ.बानुगडे पाटील यांनी स्नेहल जगताप यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष निलेश सुतार, अजय सलागरे, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे तसेच अन्य मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्नेहल जगताप कामत यांना मशाल चिन्हासमोरील बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन करून आपआपले विचार मांडले. याप्रसंगी स्व.माणिक जगताप यांच्या पत्नी श्रीमती पुष्पा जगताप या मुलीचे भाषण ऐकण्यासाठी पहिल्या रांगेत उपस्थित होत्या.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.