आगरी समाज भूषण पुरस्कार सोहळ्यात गुणवंतांचा सन्मान !

Kailas Pingale
अलिबाग :
तालुक्यात आगरी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून, समाजाने एकोपा राखून आगरी सामाजिक संस्थेच्या आनंद मेळाव्याला उपस्थित राहून विचारांची देवाण-घेवाण करायला पाहिजे. समाजासाठी मी स्वप्रयत्नांतून आगरी भवनाची निर्मिती करेन. समाजाचे हित जपणे हे माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
आगरी सामाजिक संस्थेच्या वतीने मेघा चित्रमंदिर अलिबाग येथे रविवारी (७ एप्रिल ) रोजी साहित्यिक सुरेश भोपी यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाजाचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्य अतिथी म्हणून अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी, प्रा. संजीवनी नाईक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. महेद्र दळवी यांनी आगरी सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करुन या संस्थेच्या पाठिशी आपण खंबीरपणे कायम पाठिशी राहू असे सांगितले. आगरी समाजाचा इतिहास इथल्या मंदिरांमध्ये, इथल्या शिलालेखात व इथल्या बोलीभाषेतील साहित्य रचनेतून ठायी ठायी जाणवतो, असे आपल्या भाषणात प्रा. संजीवनी नाईक यांनी म्हटले. शर्मिला पिंगळे, मनिष पाटील, सुहास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून साहित्यिक सुरेश भोपी यांनी अलिबाग ही नररत्नांची खाण असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, इथल्या मातीत शौर्य उपजले, कान्होजीराजे आंग्रे यांच्या पराक्रमाचा सुगंध अलिबागेत दरवळतो. साहित्यासोबत इथे संघटन घडले. स्वातंत्र्य पूर्व काळात नारायण नागू पाटलांनी कोकण स्तरीय शेतकरी संघाचे अध्यक्षपद भूषविले. चरीचा शेतकरी संप यशस्वी झाला.
प्रारंभी आगरी समाज भूषण पुरस्काराने ऍड. विवेक मधुकर पाटील, बबन शामराव पाटील, अंकुर तुकाराम मोकल, मनिष दत्तात्रय पाटील, संदेश सुरेश थळे, शर्मिला उमेश पिंगळे, महेश जनार्दन म्हात्रे, नंदन श्रीधर पाटील, पांडुरंग शिवराम पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच एक उपक्रम म्हणून घेतलेल्या काव्य स्पर्धेतील विजयी स्पर्धक जयश्री विलास म्हात्रे (प्रथम क्रमांक), किमया कैलास पिंगळे (द्वितीय क्रमांक), विशाखा विलास भगत (तृतीय क्रमांक), रवींद्र चांगू पाटील (उत्तेजनार्थ) यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
क्रीश विजय पिंगळे, पार्थ उमाकांत पाटील, हर्ष रवींद्र खंडागळे, तन्वी किरण थळे, विनीत प्रकाश पाटील, गोरखनाथ पाटील, योगेश नरेंद्र बैकर, विघ्नेश अनिल थळे, जगदीश थळे, सुनील निलाधर म्हात्रे या गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला.
ईशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. संस्थाध्यक्ष कैलास पिंगळे व उपाध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जयश्री म्हात्रे यांनी प्रास्ताविक भाषण केले. मेघना म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रेखा मोकल यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग मानकर, जोमा जाखू पाटील, सिद्धेश पाटील, नंदेश गावंड, अनंत पाटील, रवींद्र म्हात्रे, रेखा थळे, किमया पिंगळे, सुचिता पाटील यांनी मेहनत घेतली.
उमाजी केळुसकर, विजय चवरकर, कृष्णा जोशी, चंद्रकांत कांडपिळे, प्रज्ञा म्हात्रे, यशवंत पाटील या मान्यवरांसह आगरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading