PEN न्यूज ऑनलाइन टीम : आगरी समाजातील युवक युवतींनी योग्य शिक्षण घेऊन मेहनत करून शासकीय उच्च पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आगरी समाजाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे असे गौरवउद्गार लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी पेण येथे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळा वितरण समारंभात काढले. “ध्यास” या स्मरणिकेचे प्रकाशन शिसवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात प्रतिथयश मिळविणाऱ्या महनीय व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा उपक्रम उत्कृष्ट आहे. परंतु अशाच पध्दतीने समाजातली जी होतकरू मंडळी वेगवेगळ्या अधिकाराच्या पदावर विराजमान आहेत. अन्य क्षेत्रातही पुढे जात आहेत. प्रगती साधत आहेत. अशा मंडळींचा समाजाकडून आदर केला जात नाही, त्यांचे कौतुक केले जात नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा पुरस्कार करुन होणारी वाटचाल हीच खऱ्याअर्थाने समाजाचा गौरव वाढविणारी असते. अविचारी वृत्तीने समाजाची ओळख होता कामा नये, हे प्रत्येकाने कटाक्षाने पाळले पाहिजे. आपल्या सदविचारांनी, सत्कृत्यानी निर्माण केलेली ओळख ही समाजाचा गौरव वाढविणारी असते, हा विचार समाजात रुजणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिसवे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील म्हणाले की, सद्य:स्थितीत आगरी समाज अधोगतीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. तो रसातळाला चालला आहे, त्यांचं अस्तित्वच संपुष्टात येऊ लागलं आहे. राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणाचा हा समाजाला मिळालेला शाप आहे. अशावेळी समाजाच्या अस्तित्वातवर घाळा येत असताना समाजातला सुशिक्षित घटक पुढे आला नाही, तर भावी पिढ्या माफ करणार नाहीत. कारण त्यांनी पुढे जाण्यासाठी शिक्षण घेताना, नोकरी-धंदा मिळविताना समाजाच्या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेला असतो, त्यांचा उतराई म्हणून तरी समाजाचं काही देणं लागतो, या कृतज्ञतेच्या भावनेनं त्यांच्या आधारासाठी धाऊन जाणे गरजेचं आहे.
मात्र आतपर्यंतचा अनुभव अत्यंत वाईट आहे, जे पुढे गेले, उच्च पदावर गेले, त्यांनी मागे वळून समाजाकडडे पाहिले नाही. ते ताडासारखे उंच वाढले, मात्र त्याचा समाजबांधव अंगुला एवढाच खुजा राहिला, त्याची परिस्थिती अत्यंत विदारक बनली, म्हणून अन्यायाने पिचलेल्या, वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांने संघटित शक्ती एकवटून आपले हक्क मिळविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन सुर्यकांत पाटील यांनी केले.
यावेळी आगरी समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटविणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. मानपत्र, महावस्त्र, पुष्पगुच्छ, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यामध्ये प्रख्यात लोकगीतकार स्व. अनंत पाटील, प्रसिद्ध गायक संतोष पाटील, राष्ट्रपती पुरस्कार विजेते खेळाडू अशोक भोईर, सूर्यनमस्कारात वर्ल्ड रेकॉर्ड करणारे अजय पाटील, मेट्रोची महिला पायलट गार्गी ठाकूर, प्रख्यात चित्रकार प्रकाश पाटील, सहकार महर्षी सुरेश पाटील, शिक्षणमहर्षी अँड. पी. सी. पाटील, उद्योजक प्रदीप म्हात्रे, पत्रकारितेत आदर्श अग्रसेन, शैक्षणिक गुणवत्तेत प्राविण्य मिळवणारे स्वरूप शेळके यांचा समावेश होता.
व्यासपीठावर इगतपुरीचे माजी सभापती जनार्दन माळी, एक्साईजचे निवृत्त उपायुक्त सुहास पाटील, व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नारायणशेठ ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक संगीता पाटील, अँड. पी. सी. पाटील, सुरेश पाटील, दयानंद भगत, आदीजण उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या कविसंमेलनात ४७ कवींनी सहभाग घेतला.