पनवेल ( संजय कदम ) : संपुर्ण महाराष्ट्राचे देवस्थान तसेच आगरी कोळी, कराडी समाजाचे पुजास्थान व श्रद्धास्थान असलेल्या ‘आई एकविरा देवी’ बद्दल इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे याला सोलापुर येथून अटक केली आहे. तसेच दुस-या आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस घेत आहेत.
समस्त आगरी -कोळी, कराडी समाजाचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे नागरीकांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या ‘आई एकविरा देवी’ बद्दल इन्टाग्राम या सोशल मिडीयावर ‘आई एकविरा देवी’ बद्दल आक्षेपार्ह व अपशब्द पोस्ट करून धार्मिक श्रद्धांचा अपमान केल्याप्रकरणी पनवेल कोळीवाडा येथील किरण पवार यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट करणा-या इसमांविरूद्ध तक्रार दाखल केली होती.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हयाचा तपास परिमंडळ २ पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांचे आदेश व सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले, अविनाश पाळदे, मिलींद फडतरे यांनी सायबर व तांत्रिक तपास करून सदर गुन्हयातील आरोपी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे (वय ३६, रा. श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापुर) याचा सहभाग निष्पन्न केला.
सदर आरोपीची माहिती काढून पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउपनि अभयसिंग शिंदे व पथक यांचेशी समन्वय साधुन आरोपी शैलेश शेंडगे याला सोलापुर येथून ताब्यात घेवून अटक केली आहे. सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन पनवेल तालुका पोलीस गुन्हयाचा अधिक तपास करीत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.