मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणानंतर पोलादपूर महाबळेश्वर ते वाई शिरूर रस्ता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ताब्यात गेल्याने आता रूंदीकरणासाठी भूसंपादन झाल्यास भरीव मोबदल्याची स्थानिकांना प्रतिक्षा आहे. ठिकठिकाणी जीर्णावस्थेत गेलेल्या या घाटरस्त्यामुळे अपघात तसेच रस्ते खचण्याचे प्रमाण वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस येथील अंकलखोप गावच्या धारकऱ्यांची पिकअप तीव्र वळण उतारावर नियंत्रण सुटून संरक्षक कठडयावर आदळून पलटल्याच्या अपघातावेळी या रस्त्याचा धोका स्पष्ट झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत क्षेत्रात असलेल्या महाबळेश्वर-वाई ते शिरूर रस्त्याच्या आंबेनळी घाटातील रूंदीकरणास सुरूवात झालेल्या रस्त्यापैकी पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील साधारणत: 24.200कि.मी.रस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये असताना दरीच्या बाजूने रुंदीकरण, देखभाल दुरूस्ती तसेच संरक्षक कठडे आणि डोंगरउताराच्या बाजूने रूंदीकरण, डांबरीकरण तसेच साईडपट्टयांचे मजबूतीकरण आदी कामे सातत्याने सुरू राहिली. दर दोनचार वर्षांनंतर दरडी कोसळण्याने आंबेनळी घाटरस्ता सातत्याने बंद ठेऊन कामे करावी लागत असताना 21 जुलै 2021च्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाट अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाताहत झाली. यानंतर या रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबूतीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ताब्यात हा संपूर्ण आंबेनळी घाटरस्ता सोपविण्यात येऊन सातारा बाजूने या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर शहर, कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत रानबाजिरे, काटेवाडी, सिध्दार्थनगर, भराववाडी, कापडे कमानीचा परिसर तसेच आड, चांभारगणी, कुंभळवणे, पायटे, दाभिळटोंक पर्यंतच्या या 24.200कि.मी.रस्त्याचे रूंदीकरण होण्याची शक्यता दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत कोणताही दुजोरा देण्यात आला नसला तरी आजमितीस रस्त्याची मोजणी व अन्य कामांना सुरू झाली आहे. यामुळे रस्त्यावरील अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांना मोबदला मिळणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जमिनमालक आणि अधिकृत इमारतींचा मोबदला तसेच अशा इमारतींसमोरील टपऱ्यांच्या मोबदल्याबाबत पोलादपूर शहरातील धोरण राबविले गेल्यास अनेकांवर अन्याय होण्याची भावना दिसून येत आहे.
महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत महाबळेश्वर-वाई ते सुरूर रस्त्याच्या आंबेनळी घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने जनसुनावणी घेऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनावेळी टाळलेल्या जनसुनावणीप्रमाणे अन्याय्य कृती न करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सद्यस्थितीत पोलादपूर तालुक्यातील दरीकडील बाजूला रस्ता खचण्याच्या घटनांमुळे संरक्षक कठडे अधांतरी लोंबत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे डोंगरातील दगड सुटून रस्त्यालगतच्या साईडपट्टीवर पडलेले अनेक ठिकाणी दिसतात. यामुळे पोलादपूर ते आंबेनळी घाटातील रायगड जिल्ह्यातील रस्त्याच्या दुतर्फा रस्ता दरीत कोसळतोय आणि डोंगर रस्त्यावर येतोय, अशी परिस्थिती असल्याने आगामी पावसाळयापूर्वी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.