
आंगवली ( संदीप गुडेकर ) :
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली सोनारवाडी ग्रामपंचायतीसाठी यापूर्वी शासनाने 75 लाख रुपयांची जल स्वराज्य योजना आणली होती, मात्र या योजनेअंतर्गत गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले नाही. आता केंद्र शासनाच्या जल जीवन योजना अंतर्गत आंगवली सोनारवाडी गावासाठी नवीन योजना मंजूर करण्यात आली आहे, मात्र बुरंबी गावातील ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे आजतागायत ही योजना पूर्ण झालेली नाही.
ग्रामपंचायतीने या योजनेचा ताबा अद्याप घेतलेला नाही, कारण ठेकेदाराचे काम अपूर्ण आहे. ग्रामसेवक, सरपंच, आणि उपसरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, शासनाने योजनेचा ताबा अद्याप त्यांच्याकडे सुपूर्द केलेला नाही. ठेकेदाराने मात्र या योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले असून, गावात रोज नियमितपणे पाणी पुरवले जात असल्याचा दावा केला आहे.
प्रत्यक्षात, आंगवली सोनारवाडीतील नागरिकांच्या मते, गावातील कोणत्याही वाड्यांवर पाणी पोहोचत नाही. यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ग्रामस्थांनी रत्नागिरी सीओ, जिल्हाधिकारी, देवरुख तहसीलदार, आणि बीडीओ यांना गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या योजनेचे सत्य समोर येईल आणि योग्य कारवाई होईल.