PEN न्यूज ऑनलाइन टीम :
विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळात जातीय आणि विभागीय समतोल राखण्यात आला आहे. नागपूरमधील राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यापूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथबद्ध झाले होते.
नवीन मंत्रिमंडळाच्या ४२ सदस्यांमध्ये २० नवीन चेहऱ्यांना स्थान मिळाले असून, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार यांसारख्या काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळाबाहेर करण्यात आले आहे. मंत्रिमंडळात मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती, आदिवासी, धनगर, अल्पसंख्याक, तसेच बिगर मराठी समाजाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे. विभागीय समतोल राखत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागांतील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपमधून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशीष शेलार, राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे यांना संधी मिळाली, तर शिवसेनेच्या उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. कायद्यानुसार ४३ मंत्रिपदांची तरतूद असल्याने एक मंत्रिपद अद्याप रिक्त असून, ते कोणासाठी ठेवले आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
विस्ताराचे मुद्दे
-
नव्या मंत्रिमंडळात एकूण चार महिला मंत्री आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे.
-
रविवारी ३३ कॅबिनेट मंत्र्यांचा व सहा राज्यमंत्र्यांचा शपथिधी झाला
-
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण ४२ मंत्री आहेत
-
मंत्रिमंडळात भाजपाने नऊ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
-
शिवसेनेने सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
-
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे १७ कॅबिनेट मंत्री व तीन राज्यमंत्री आहेत
-
शिवसेनेचे १० कॅबिनेट व दोन राज्यमंत्री आहेत.
-
राष्ट्रवादीचे आठ कॅबिनेट व एक राज्यमंत्री आहेत.
-
सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदं मिळाली आहेत. साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. शंभूराज देसाई (पाटण), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण) व मकरंद पाटील (वाई) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.
-
पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळालं आहे.
-
नाशिक व जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत.
-
नाशकात दादा भुसे, माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.
-
जळगावात गुलाबराव पाटील, गिरीश महाजन व संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.
-
रत्नागिरी जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत, तर एक राज्यमंत्री मिळाले आहेत. उदय सामंत व नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे, तर योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे.
-
रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. यामध्ये आदिती तटकरे व भरत गोगावले यांचा समावेश आहे.
-
कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे.
-
ठाणे जिल्ह्याला दोन मंत्री लाभले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे व प्रताप सरनाक यांचा समावेश आहे.
-
मुंबईला मंगलप्रभात लोढा व आशिष शेलार यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री लाभले आहेत.
-
राज्यातील १९ जिल्ह्यांना किमान एक तरी मंत्री लाभला आहे.
-
१४ जिल्ह्यांना एकही मंत्रीपद मिळालेलं नाही.