राजकारणात आणि समाजकारणात अनेक नेते पाहिले. काही पुढार्यांचे कार्य जवळून बघितले. मात्र राजकारण करताना कार्यकर्त्यांना मनापासून जपणारे नेते दिसले नाहीत. कार्यकर्त्यांच्या भावना ओळखणारे समाज नेते हल्ली पहावयास दुर्मिळ होत चालले आहे. मात्र स्वर्गीय माजी आमदार अशोक दादा साबळे हे कार्यकर्त्यांना हाताच्या फोडाप्रमाणे जपणारे आणि त्यांची नस ओळखून मायेची पखरण करणारे नेतृत्व आणि दातृत्व होते. दादासाहेब साबळे यांच्या सारखे नेते पुन्हा घडणं आता कधीच घडणं अशक्य आहे अशा भावना अशोक दादा साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते महादेव बक्कम यांनी व्यक्त केल्या.
१९७१ पासून त्यांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून काम करीत होतो. त्यांनी अनेकांचे संसार उभे केले. कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला. संकटात मदत करुन धीर दिला. माया आणि प्रेम दिले. त्यांचे सुपुत्र ॲड. राजीव साबळे यांना माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. विघवली शाळा केवळ अशोक दादा साबळे यांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरू झाली. त्यांनी उदात्त हेतूने प्रेरित होउन विघवली शाळेची मान्यता आणि संपूर्ण अर्थिक मदत केली. त्यामुळेच विघवली शाळेत खेडेगावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे सांगून महादेव बक्कम यांनी अशोक दादा साबळे यांच्या आठवणींना नवीन उजाळा दिला.
अशोक दादा साबळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी राजाभाऊ रणपिसे यांनी त्यांच्या बद्दल बोलताना सांगितले की, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, उपसभापती, सभापती आणि दोनदा आमदार हि पदे प्रचंड संघर्ष करुन मिळवली. कार्यकर्त्यांच्या जोरावर सभापती पदावर आलेला अविश्वास ठराव फेटाळला गेला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री अ.र. अंतुले यांनी १९८१ मध्ये जाहीर सभा घेऊनही ते १२०० मतांनी विजयी झाले होते. इतकी प्रचंड इच्छाशक्ती आणि राजकीय ताकद त्यांच्यात होती.
त्यांच्याकडे धन दौलत नव्हती. तरीही केवळ जनतेच्या प्रेमामुळेच ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले. ते प्रत्येक समाजाला न्याय देत होते. ते गरीबांचे देवदूत होते. त्यांच्या विधानसभा निवडणुकीत शासकीय कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी प्रवृत्त केले होते. ती निवडणूक केवळ २६ हजारांत जिंकली होती. अशी निवडणूक जिंकणारे अशोक दादा साबळे हे पहिलेच आमदार असावेत. इतके प्रचंड जिवापाड प्रेम आणि विश्वास त्यांच्यावर होते अशा आठवणी आणि प्रसंग राजाराम रणपिसे यांनी यांनी सांगितल्या.
अशोक दादा साबळे यांची नात आणि मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या चेअरमन निकिता साबळे – जैन यांनी सांगितले की, माझ्यावर जितके प्रेम केले. त्यापेक्षा प्रेम त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नातवांवर त्यांनी केले होते. ते नेहमी सर्वांचीच काळजी घेत होते अशा बालपणीच्या आठवणी सांगताना उपस्थितांना गहिवरून आले होते. तसेच सचिन शेट, प्रदिप गांधी यांनीही दादासाहेब साबळे यांचे प्रसंग अधोरेखित केले. महाराष्ट्र सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन प्रदिप गांधी यांनी दिले.
सुरवातीला सकाळी १० वाजता अशोक दादा साबळे विद्यालयातील स्मारकामध्ये स्वर्गीय दादा साबळे यांच्या स्मृतींना दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दादासाहेब साबळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या अभिवादन सभेसाठी पत्नी वंदना साबळे, बंधु संजय अण्णा साबळे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, नगरसेवक प्रशांत साबळे, निकीता साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, महादेव बक्कम, राजाराम रणपिसे, कृष्णा भाई गांधी, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, चेअरमन नरेंद्र गायकवाड, प्रदिप गांधी, नितीन बामगुडे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, नगरसेवक सचिन बोंबले, ॲड. विनोद घायाळ, अशोक दादा साबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर, समाधान उतेकर, शिवसेनेचे नगरसेवक अजित तार्लेकर, पालकर, सुमित काळे दिलीप जाधव, विरेश येरुणकर, धनाजी जाधव, मनिषा मोरे, निशिगंधा मयेकर दिलीप उभारे, आदी मान्यवर, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.