विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निपक्ष, शांततापूर्ण आणि प्रलोभनमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्ह्याच्या रस्ते आणि सागरी सीमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच अवैध मार्गाने होणाऱ्या दारू वाहतुकीवर देखील करडी नजर ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसें, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था, बेकायदेशीर मार्गाने होणारी सर्व प्रकारची वाहतूक रोखणे, जप्ती याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पाडू शकणाऱ्या सीमावर्ती भागातील संवेदनशील ठिकाणे ओळखून त्याठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी तपासणी नाके असणार आहेत. या माध्यमातून सर्व हालचालीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अंमली पदार्थ, दारू, शस्त्रे आणि स्फोटकांसह प्रतिबंधित वस्तूंच्या हालचालींना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. जिल्हा सीमेवरून होणारे दारू आणि रोकड वाहतुकीची निर्गमन आणि प्रवेश स्थाने ओळखून त्यावर सर्व संबंधित जिल्हा पथकाने योग्य ती कारवाई करावी असे या बैठकीत सर्वानुमते ठरले.
निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही असे निर्देश आयोगाने दिले आहेत. रस्ते, सागरी आणि रेल्वे मार्गाने होणाया वाहतुकीची प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सहभागी सर्व जिल्हाधिकारी यांनी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती सादर केली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.