अलिबाग रेवस मार्गावर भरधाव BMW थेट घुसली गॅरेजमध्ये, तिघेजण गंभीर जखमी, दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान

Bmw Accident
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 
अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर रविवारी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी एका बीएमडब्ल्यू लक्झरी कारच्या भीषण अपघातामुळे मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, संदीप विलास गायकवाड (वय ४१) या चालकाने आपल्या बीएमडब्ल्यू कार (क्रमांक एमएच ०६ बीई २००) बेदरकारपणे चालवताना गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी गॅरेजच्या शेडमध्ये घुसवली. या अपघातामुळे गॅरेजमधील रवी लक्ष्मण पाटील (वय ५०), मंगेश यशवंत म्हात्रे (वय ५२), आणि सोनू मधु नाईक (वय ४५) हे तिघे गंभीर जखमी झाले.
मद्यधुंद अवस्थेत कार चालवण्याचा संशय
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली असल्याचे दिसून आले. गाडीने गॅरेजमधील दुचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या प्रकरणात नील पाटील यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संतप्त प्रतिक्रिया: लक्झरी कार चालकांवर कठोर पावले उचलण्याची मागणी
अपघातानंतर स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, अलिशान लक्झरी गाड्या चालवणाऱ्या मद्यधुंद चालकांची बेपर्वाई थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिक कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. वेळोवेळी नाकाबंदी करून या वाहनांची तपासणी केली जावी, असेही नागरिकांनी सुचवले.
पोलिसांची तत्परता
मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले आणि वाहतूक पूर्ववत केली. याबाबत कार चालक संदीप विलास गायकवाड(वय ४१)रा. चोंढी- अलिबाग जि. रायगड यांच्या विरोधात मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे दिनांक ०९/१२/२०२४ रोजी रात्री १२ वाजून ४८ मि. वाजताचे सुमारास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे अंमलदार ए. एच. राठोड यांनी गुन्हा रजि.१२१/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २८१,१२५(अ) १२५ (ब), सह मो.वा. का. १९८ ९ (क) १८४. १८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून कार चालक संदीप विलास गायकवाड यांची मद्यसेवन बाबतीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे व पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सदर अपघाताबाबत अधिक तपास मांडवा पोलीस निरीक्षक  भोई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
रस्त्यावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी तसेच प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading