अलिबाग: चोंढी येथे प्रथमच मियावाकी पद्धतीनं ११ हजार वृक्षरोपांची लागवड

अलिबाग: चोंढी येथे प्रथमच मियावाकी पद्धतीनं ११ हजार वृक्षरोपांची लागवड
अलिबाग/सोगाव (अब्दुल सोगावकर) :
अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील चोंढी येथील स्मशानभूमी येथील मोकळ्या जागेत आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया आणि ग्रुप ग्रामपंचायत किहीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता विविध प्रकारच्या ११ हजार रोपांचे मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व आगाखान संस्थेच्या अलिबाग तालुका प्रकल्प व्यवस्थापक अमृता पराडकर यांच्याहस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया हि संस्था मागील काही काळापासून अलिबाग तालुक्यातील ढासळत असलेल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. आगाखान संस्थेच्या माध्यमातून वनीकरण वाढावे तसेच भूजल पातळी वाढावी यासाठी तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत, वनविभाग व इतर सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत आहेत. यापूर्वी आगाखान संस्थेच्या वतीने आवास, सासवणे, किहीम, थळ, नवगाव, ढवर, बामणगाव, चौल, रेवदंडा या गावातील समुद्रकिनारी व खाडीकिनारील भागात तब्बल २२ हजार झाडे लावली आहेत, तर किहीम, नवगाव, आवास, सासवणे, थळ, नवेदर बेली, नागाव, कुरुळ, या गावांमध्ये तब्बल ८० हजार फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली आहेत.
यापुढेही मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच चोंढी स्मशानभूमी येथील मोकळ्या जागेत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या संकल्पनेतुन व आगाखान संस्थेच्या माध्यमातून आम्ही मियावाकी पद्धतीने तब्बल ११ हजार रोपांची लागवड करत आहोत, असा मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड करण्याचा आमचा रायगड जिल्ह्यातील पहिलाच प्रयत्न करीत असल्याचे आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया संस्थेच्या अलिबाग तालुका प्रकल्प व्यवस्थापक अमृता पराडकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले.
यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या जान्हवी वाघे, निधी काठे, जागृती जरंडे, विणा जाधव, शरद आमले, जितेंद्र जरंडे, विकास जाधव यांच्यासह आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया संस्थेच्या अलिबाग तालुका प्रकल्प व्यवस्थापक अमृता पराडकर, प्रकल्प समन्वयक विशाल सोनावणे, समुदाय संघटक विराज बांदिवडेकर, समृद्धी पाटील, अभिजित वेंगुर्लेकर, स्नेहल पाटील, शितल पाटील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मियावाकी पद्धत म्हणजे काय ?
मियावाकी ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड केली जाते. या तंत्रज्ञानात निसर्गाबरोबरच विज्ञानही आढळते म्हणूनच प्रा. मियावाकी म्हणतात ‘ही निसर्ग आणि विज्ञानाची शुद्ध मैत्री आहे’. सर्वसाधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत २५० मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या ४० पेक्षाही जास्त देशी पण दुर्मीळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते, ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही. सर्व आपआपसात स्पर्धा न करता समान पातळीवर वाढताना आढळतात. ही पद्धत शक्यतो मोठमोठय़ा शहरांतील अस्वच्छ, अतिक्रमणग्रस्त, पडीक भूखंडांवर शास्त्रीय पद्धतीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते.
वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातीची त्यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते आणि हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे. येथे विदेशी वृक्षांना स्थान नसते. सर्व तंत्रज्ञान जमिनीखालील उपयोगी जिवाणू, खेळती हवा, शेणखत आणि भाताच्या तुसावर अवलंबून असते. मियावाकी जंगल हे घरांच्या मागे, मंदिर परिसर, शाळा, महाविद्यालये, उदयोगसमूहांच्या जागा तसेच रस्त्यांच्या दुतर्फासुद्धा करता येते. ही एक निसर्ग प्रयोगशाळाच आहे ज्यामध्ये देशी वृक्षांची ओळख विद्यार्थ्यांना होतेच, पण त्याचबरोबर वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाचे धडेही त्यांना मिळतात. वृक्ष आणि शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचा मजबूत धागा निर्माण होणे हा सध्याच्या वातावरणबदलावरचा प्रभावी उपाय आहे. शाळा महाविद्यालयांमधून अशा प्रकारची उद्याननिर्मिती विद्यार्थ्यांना शाश्वत पर्यावरण आणि निसर्ग रक्षणाचे योग्य धडे देऊ शकते.
मियावाकी पद्धतीसाठी क्षेत्र किती असावे याचे बंधन नाही मात्र ठरावीक क्षेत्रात योग्य संख्येनेच वृक्ष हवेत, हे मात्र नियमात आहे. या तंत्रज्ञानात स्थानिक जागेवरील मूळ माती तीन फूट खोल खड्डा करून काढली जाते आणि पुन्हा तेथील चाळलेली माती, खत आणि भाताचे तूस यांचे मिश्रण करून भरली जाते. ही संपूर्ण जैविक पद्धती असून येथे सेंद्रिय घटकांचाच वापर होतो. रासायनिक खते, कीटकनाशकापासून हे तंत्रज्ञान मुक्त असते. मियावाकीचा पृष्ठभाग स्पंजप्रमाणे असतो म्हणून मुसळधार पावसात तो वाहून जाऊ शकतो त्यामुळे या जंगलांची निर्मिती उतारावर किंवा पावसाळय़ात करणे टाळावे. मियावाकीस योग्य कुंपण घालून पहिली दोन वर्षे सांभाळल्यास तिसऱ्या वर्षी ही उद्याने स्वतंत्र आणि स्थिर होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading