रायगड जिल्ह्याची राजधानी आणि महाराष्ट्राच्या तिसऱ्या मुंबई म्हणून ओळख मिळवत असलेल्या अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारीवर पडलेले महाकाय खड्डे आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. पेण-अलिबाग मुख्य मार्गावर असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासामुळे अलिबाग ‘खड्ड्यांचे शहर’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते.
परंतु अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाला आव्हान देत स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून, त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशांत नाईक यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष झाले. इतकेच नव्हे तर या रस्त्यावर पडणारे अपघात, नागरिकांचा बळी, आणि खड्ड्यांचे साम्राज्य जाणून-बुजून दुर्लक्षित केले गेले. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांची या मार्गावर सतत ये-जा असते, तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
भाजप कार्यालय जवळच असतानाही दुर्लक्ष
या मार्गापासून अगदी काही मीटर अंतरावर भाजपचे जिल्हा कार्यालय असूनही, त्याचे कोणतेही सकारात्मक प्रतिबिंब दिसून आले नाही. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या, याबाबतही प्रशासन गोंधळात असल्याचे दिसून आले.
रेवदंडा बायपास: अलिबागसाठी महत्त्वाचा दुवा
अलिबाग-रेवदंडा बायपास जंक्शन हा केवळ एक रस्ता नाही, तर अलिबागच्या वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा आहे. येथे असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना, पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. धूळ, खड्डे आणि अपघातांनी ग्रासलेला हा मार्ग एक मोठी समस्या बनला होता.
प्रशांत नाईक यांचा सकारात्मक पुढाकार
या गंभीर परिस्थितीला समजून घेत प्रशांत नाईक यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. आपल्या निधीतून आणि सामाजिक जाणिवेतून प्रेरित होऊन त्यांनी या खड्ड्यांची दुरुस्ती सुरू केली. या उपक्रमामुळे हा रस्ता अधिक सुरक्षित, वेगवान आणि प्रवासयोग्य होणार आहे.
पर्यटन व्यवसायाला नवी गती
अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हा रस्ता मुख्य प्रवेशद्वार असून, तो चांगल्या स्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशांत नाईक म्हणाले, “रस्ते हे विकासाचे आरसे असतात. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे अलिबागच्या पर्यटन व आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा मला विश्वास आहे.”
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.