तब्बल एक तप उलटल्यानंतरही मुंबई- गोवा महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असतानाच नागोठणे शहराच्या पूर्वेकडील निवासी वसाहत व डोंगरावरील अनेक आदिवासी वाड्यातिल नागरिक व बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलात शिकणाऱ्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सदरील संतापजनक प्रकरणाची नागोठणे पत्रकार संघाने दखल घेतली आहे.
● जुना पूल रुंदी 10 फुट तर नवीन 05 फूटी
महामार्गाजवळ असलेल्या जुना पादचारी पुलाची रुंदी दहा फुट असली तरी ठेकेदाराने त्याला समांतर नव्या पादचारी पुलाची रुंदी मात्र फक्त पाच फूट एवढीच ठेवली आहे. एकाच वेळी विद्यार्थी या पुलावर आले तर चेंगराचेंगरी होऊन विद्यार्थ्यांच्या जीवालाच धोका पोहोचू शकतो. महामार्ग अधिकारी आणि ठेकेदारांच्या ‘गोलमाल है भाई.. सब गोलमाल है’ या कारभारामुळे हा पूल मृत्यूचा सापळा बनला असून या बेफिकिरीच्या विरोधात पालक व नागोठणेकरांच्या संतापाचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता आहे.
● चेंगराचेंगरी झाली तर जबाबदार कोण?-
बापूसाहेब देशपांडे विद्या संकुल मुंबई-गोवा महामार्गापलीकडे आहे. महामार्ग विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून पादचारी पूल बांधण्यास घेतला आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र त्याची रुंदी हा शहरात संतापाचा विषय बनली आहे. शाळेला खेटूनच रेल्वे जात असल्याने रेल्वे खात्याने यापूर्वीच एक पादचारी पूल बांधला आहे. या पुलाची रुंदी दहा फूट इतकी आहे. मात्र त्यालाच समांतर पुढे नेलेल्या अर्थात नव्याने बांधलेल्या पुलाची रुंदी महामार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदाराने चक्क निम्यावर आणून पाच फूट इतकीच ठेवली आहे.
हा सगळा प्रकार अनाकलनीय आणि संशयास्पद असून या पुलाच्या उभारणीतील निधी दुसरीकडे कुठे मुरलाय का? अशी शंका पालक व नागोठणेकर व्यक्त करत आहेत.अरुंद पुलामुळे चेंगराचेंगरी होऊन एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल विचारण्यात येत आहे.
● गर्दीमुळे अनर्थ ओढवण्याची शक्यता- विद्या संकुलाच्या बाजूला निवासी वसाहत तसेच वरील डोंगरावर अनेक आदिवासी वाड्या असून येथील नागरिक व आदिवासी बांधव कामानिमित्त दररोजच नागोठण्यात येतात. त्यातच विद्यार्थ्यांची गर्दी पुलावर झाल्यास अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे.
● नवा पुल स्मशानभूमी जवळ उतरतो – नव्याने बांधण्यात आलेला पूल एका स्मशानभूमीला खेटून उतरवला असून अंत्यसंस्कर सुरू असताना शाळेतील लहान मुले व विद्यार्थी भयभीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
● नागोठण्यातील अरुंद पादचारी पुलाबाबत तांत्रिक माहिती देण्यास संबंधित ठेकेदार व अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या पुलाच्या कामात चुना तर लागला नाही ना, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. दरम्यान आम्हाला आखून दिलेल्या रुपरेषेप्रमाणे आम्ही नवीन पादचारी पूल बांधला अशी प्रतिक्रिया संबंधित ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
● नागोठणे पत्रकार संघाचं निवेदन
गर्दीच्या ठिकाणी अरुंद पूल बांधून महामार्ग विभागाने विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला असल्याने या प्रकरणाची नागोठणे पत्रकार संघाने गंभीर दखल घेतली आहे. नागोठणे पत्रकार संघ विद्यार्थी व पालकांच्या सह्यांचे निवेदन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व स्थानिक खासदारांना देण्यात येणार आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.