अब्दुलहक खलफे यांच्या लाक्षणिक उपोषणाची आश्वासनाने सांगता

Poladpur Uposhan Khalape
पोलादपूर (शैलेश पालकर) :
कालवली येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांनी कालवली येथील जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामाबद्दल जागृत नागरिक म्हणून अनेकवेळा उपअभियंता कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही जलजीवन योजनेची अनेक कामे अपूर्ण ठेवल्याने आज बुधवार, दि. 9 एप्रिल 2025 रोजी त्यांनी पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या आवारामध्ये लाक्षणिक उपोषण केले.
सकाळपासून अब्दुलहक खलफे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सप्तक्रोशीतील ग्रामस्थ समीर चिपळूणकर, सवादचे पत्रकार अमीर तारलेकर, मुराद वलीले, धोंडीराम सकपाळ, अब्दुल रझाक खलफे, सुलतान खलफे, उमाजी जाधव, शांताराम जाधव, विठ्ठल सकपाळ, मुबीन खलफे यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, चेअरमन वैभव चांदे, शेकापक्षाचे विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दिलीप भागवत तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि तहसिल कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून स्वाक्षरी करीत पाठिंबा दिला.
यावेळी एआय कन्स्ट्रक्शन ठेकेदारांनी कालवली नळपाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उथळ बांधल्याने दोन तासातच पाणीपुरवठा बंद होत असल्याकडे उपोषणकर्ते अब्दुलहक खलफे यांनी लक्ष वेधले. यावेळी कालवली ग्रामस्थांना डोहाचे प्रदूषित पाणी मिळत असल्याने ते अपायकारक असल्याचेही खलफे यांनी निदर्शनास आणले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जनजीवन मिशन योजनेच्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास जाऊन पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे सांगून वारंवार पत्रव्यवहार करूनही दूर्लक्ष करीत ठेकेदाराला अनुकूल असल्याचे प्रशासनाने संकेत दिल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्ते अब्दुलहक खलफे यांनी केला.
उपोषणकर्ते खलफे यांचे उपोषण सोडविण्यासाठी पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, गटविकासअधिकारी दिप्ती गाट आणि जलजीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाच्या सहायक अभियंता जाधव, पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कांबळे, ग्रामीण पाणी पुरवठयाचे ज्युनियर इंजिनियर स्वप्नील कांबळे तसेच अन्य अधिकारी व एआय कन्स्ट्रक्शन ठेकेदार उपस्थित होते.
यावेळी 20 दिवसांत कालवली ग्रामस्थांना नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी न उपलब्ध केल्यास  येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार उपोषणकर्ते अब्दुलहक खलफे यांनी व्यक्त केला. यावेळी तहसिलदार कपिल घोरपडे तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाच्या सहायक अभियंता श्रीमती जाधव यांनी लेखी आश्वासन देऊन कालवली नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. यानंतर तहसिलदार कपिल घोरपडे यांच्याहस्ते पेयजल प्राशन करून उपोषण स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading