अबला नव्हे सबला तू

Jagtik Mahila
स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस,
भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस,
भविष्याकरिता स्वप्नसती असतेस,
संसाराच्या दहा फूटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा बसवण्याची
तुझी किमया मला अजूनही समजली नाही…
हे वर्णन अर्थातच समस्त महिलांना तंतोतंत लागू पडते. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वात पहिला महिला दिन 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्यात आला. 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. यानंतर ठळकपणे स्त्रियांच्या समस्या समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी येत गेली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतीक परिस्थितीनुसार स्त्रियांच्या प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले. एकोणिसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला. भारतातही अनेक समाज धुरिणांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजाराम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, रमाबाई रानडे यांचे योगदान मोलाचे आहे. सती प्रथा, केशवपण, बालविवाह, देवदासी अशा अनेक कुप्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाच्या चळवळीने सुद्धा जोर धरला. स्त्रिया विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यात सहभागी होऊ लागल्या.
स्वतःच्या वाटेला दुःखाचे काटे असताना दुसऱ्याला फुल देणे हे आद्यकर्तव्य समजणारी ती स्त्रीच होय. पण आजही समस्त महिलावर्ग असंख्य समस्यांचा सामना करत आहेत. जिथे फुलांच्या वस्त्यांवर वणवे लावले जातात आणि स्वामित्वाचे उत्सव आनंदाने साजरे होतात, पण तिथल्या करुण कहाण्या दुःखाने उद्गारतात, स्त्रीजन्म एक जुलुम आहे, स्त्री जन्म एक जुलुम आहे. मुलगी शिकली प्रगती झाली हे खरे. पण स्त्रियांची परिस्थिती खरोखर सुधारली का? हे प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. बायकांची दुःखे बायकाच जाणोत, प्रसूतीच्या कळांचा कळवळा पुरुषाला येऊन किती येणार? जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळती खऱ्या यातना. आजही स्त्रियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काळ बदलला. समस्यांचे स्वरूप बदलले. काही समस्या मात्र जैसे थे परिस्थितीतच आहेत. अजूनही स्त्रीचा जन्मच काही ठिकाणी होऊ दिला जात नाही. उमळण्या आधीच काही जण कळी खुडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ती कळी असे म्हणते
विणवुनी पोटामध्ये सांगत असे बाळ, माये मला मारू नको चुकलं माझं काय?
शिक्षणामुळे आधुनिक काळात स्त्रियांची परिस्थिती सुधारत आहे. आज स्त्रिया हिमालयापासून ते अंतराळापर्यंत सगळीकडे आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन मंगळापर्यंत झेप घेत आहेत. स्त्री ही कितीही सुशिक्षित आणि मिळवती असली तरी तिच्या अंतकरणाची मूळ प्रेरणा घरच आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढतात,झगडतात आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. भारतीय संस्कृतीच्या कुटुंब या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू स्त्री होय.महिला आपल्या स्त्री सुलभ वात्सल्याने आपल्या कुटुंबाचे पोषण आणि संवर्धन करतात. स्त्रीचे दयाळू हृदय हीच स्त्रीची खरी संपत्ती. स्त्री ही पैशावर नव्हे तर प्रेमावर, वासल्यावर जगते. आपल्या अंतरंगात सुगंधित कस्तुरी आहे. हे कस्तुरीमृगाला कोठे ठाऊक असते. त्याचप्रमाणे स्त्रीला आपल्या वास्तल्याबद्दल.
काळ बदलत आहे. आजची स्त्री स्वकर्तृत्वावर स्वतःला सिद्ध करत आहे. क्षेत्र कोणतेही असो प्रगतीची क्षितिजे विस्तारतच आहेत. पण आजच्या स्त्रीने सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की केवळ पुरुषांची स्पर्धा करण्याकरिता बाहेर न पडता स्वाभिमान व स्वअस्तित्व निर्माण करावे. महिला सक्षमीकरण चळवळ जगभर सुरू आहे. प्रत्येक नारीने लक्षात ठेवले पाहिजे की आपण अबला नव्हे तर सबला आहोत.
कोमल है कमजोर नही तू, शक्ती का नाम ही नारी है।
सबको जीवन देने वाली तू,मौत भी तुझसे हारी है।
Swati Gudhekar
स्वाती सुनिल गुढेकर
सहा शिक्षिका, 
न्यू इंग्लिश स्कूल पालवणी ता. मंडणगड, जि.रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading