पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यामध्ये महिलांच्या मोबाईलवरील व्हाटसएप मेसेज सर्वाधिक व्हायरल होत असताना सर्वच महिलांना नववर्षाचे स्वागत सकाळी गुढी उभारणे, नैवेद्य, गोडधोडाचा बेत करणे, कुटूंबियांसोबत आनंद साजरा करण्यातून वेळ मिळणार नसल्याने सायंकाळी नववर्ष शोभायात्रेचा मुहूर्त काढल्याचे समाधान व्यक्त होत होते.
व्हाटसएपवरील हा मेसेज लिहिला होता शहरातील ज्येष्ठ महिला नेतृत्व माई तथा उज्ज्वला जयंत शेठ यांनी आणि या मेसेजमुळे तब्बल दोनशेहून अधिक महिला व तरूणी पोलादपूर शहरातील श्रीराममंदिरालगत जमल्या आणि आरतीनंतर पोलादपूर शहरातून शिस्तबध्द तसेच उत्साहामध्ये शोभायात्रा काढून शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळयाजवळ या सांज नववर्ष शोभायात्रेची सांगता झाली.
मंगळवार, दि. 9 एप्रिल 2024 श्री शालिवाहन शके 1946 हिंदू नववर्ष दिनाच्या निमित्ताने समस्त पोलादपूरवासिय महिला व तरूणींनी प्रथमच संध्याकाळी भव्यदिव्य अशी शोभा यात्रा काढली. महिलांनी बरोबर 5 वाजता श्रीराम मंदिरात रामरक्षा व आरती करून केली आणि नंतर बरोबर साडेपाच वाजता खालूबाजा या पारंपारिक वाद्याच्या गजरात शोभायात्रा श्रीराम मंदिरातून बाजारपेठ मार्गे श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाकडे निघाली.
जय श्रीराम, श्रीछत्रपती शिवाजीमहाराज की जय, वंदेमातरम अशा घोषणांनी आसमंत दूमदूमून गेला. महिला वर्ग पारंपारीक वेशात नटून-थटून उपस्थित होता. महिलांनी खालूच्या तालावर गरबा, फुगडया घातल्या. श्रीछत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळयाजवळ आल्यावर बरोबर सात वाजता महाराजांना पुष्पहार अर्पण करून व महाराजांची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण वातावरण जल्लोषपूर्ण व भक्तिमय झाले होते. याप्रसंगी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहलदिदी जगताप यांच्या उपस्थितीने सर्वच महिलांना आनंद द्विगुणित झाला.
यावेळी पोलादपूर शहरातील ज्येष्ठ महिला नेतृत्व माई तथा उज्ज्वला जयंत शेठ यांनी पुढील वर्षी हा कार्यक्रम अजून जल्लोषात करू, असे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता केली.