उरण :
अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावातील रहिवासी आणि शिक्षक असलेल्या 52 वर्षीय वैभव पिंगळे यांनी इन्स्टंट लोन अॅपच्या रिकव्हरी एजंटच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी शुक्रवारी सकाळी उलवे जवळील अटल सेतूवरून उडी घेत आपले जीवन संपवले. प्राथमिक माहितीनुसार, काही हजार रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे रिकव्हरी एजंट त्यांना सातत्याने धमक्या देत होते असे समजते.
कर्जामुळे वाढला मानसिक तणाव
वैभव पिंगळे यांनी घेतलेले वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी काही दिवसांपूर्वी इन्स्टंट लोन अॅपद्वारे कर्ज घेतले होते. मात्र ते वेळेवर परत करू न शकल्याने लोन रिकव्हरी एजंटने त्यांच्यावर तगादा लावला. आठवडाभर सततच्या फोन कॉल्स आणि धमक्यांमुळे त्यांचा मानसिक तणाव वाढला होता अशी माहिती मिळते.
मॉर्फ केलेले फोटो पाठवून मानहानीचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोन रिकव्हरी एजंटने वैभव पिंगळे यांचे मॉर्फ केलेले नग्न फोटो त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवले. यामुळे त्यांची मानहानी झाली आणि अपमानित होण्याच्या भीतीने त्यांनी पोलिसांत तक्रार न करता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
शाळा आणि समाजात अपमानाच्या भीतीने आत्महत्या
प्राप्त माहितीनुसार शिक्षकांनी पोलिसांशी संपर्क करण्याचा विचार केला होता. मात्र, शाळा आणि समाजात बदनामी होईल, या भीतीमुळे ते पोलिसांत जाण्यास धजावत नव्हते. परिणामी त्यांनी आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
अटल सेतूवरून उडी घेत केली जीवनयात्रेची समाप्ती
शनिवारी सकाळी 9 वाजता वैभव पिंगळे उरण येथील अटल सेतूवर पोहोचले. त्यांनी गाडीतून उतरून पुलावरून खाली उडी घेतली. हा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर शिक्षकांचा मृतदेह 12 किमी अंतरावर आढळून आला.
कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
पोस्टमार्टमनंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. शनिवारी रात्री 8:30 वाजता कुर्डुस येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिकृत तक्रार दाखल नाही
पोलिसांनी शिक्षकांच्या कुटुंबीयांना तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अद्याप त्यांनी लोन अॅप कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.
लोन अॅप कंपन्यांच्या बेकायदेशीर वसुलीविरोधात कारवाईची गरज
ही घटना लोन अॅप कंपन्यांच्या मनमानी कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. बेकायदेशीर वसुलीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अनेक लोक या मानसिक छळाला बळी पडत आहेत. प्रशासनाने अशा घटनांवर कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आणखी कित्येक निरपराध लोक अशाच प्रकारे आपले प्राण गमावतील.
सदरील हे वृत्त या अगोदर ndtv मराठी मध्ये प्रसिद्ध झाले आहे.