
श्रीवर्धन ( संतोष शिलकर ) :
श्रीवर्धन येथे रवींद्र ना. राऊत विद्यालयाच्या पटांगणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या जन संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, सुधाकर घारे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर, मुश्ताक अंतुले, दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हरिहरेश्वर आणि सोमजाई मातेचे दर्शन घेऊन यात्रेची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाची ग्वाही दिली. योजनेत कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, असे सांगताना त्यांनी अशा प्रकारचे खोटे काम करणाऱ्यांना शिक्षा होईल, असे ठामपणे सांगितले. योजनेचा लाभ सर्व जाती-धर्मांतील महिलांना मिळणार असल्याची खात्री दिली. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी ते शेवटपर्यंत काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिलांच्या सुरक्षेवरही पवार यांनी जोर दिला. महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत व्यक्तींना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी, असे ते म्हणाले.
यावेळी भाजप नेते नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करताना अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांनुसार आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु दुसऱ्या जाती-धर्मावर टीका करण्याचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.